पुढील अनर्थ टाळण्यासाठी कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसताच करून घ्या तपासणी : डॉ. रामचंद्र मोहिते 

शशिकांत कडबाने 
Monday, 23 November 2020

कोरोनाचा धोका अजून संपलेला नसून, कोरोना वाढीचा वेग मंदावला असला तरी गंभीर स्वरूपातले रुग्ण आढळत आहेत. काही रुग्णांचा मृत्यूही होत आहे. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसताच तपासणी करून घ्या, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी केले. 

अकलूज (सोलापूर) : कोरोनाचा धोका अजून संपलेला नसून, कोरोना वाढीचा वेग मंदावला असला तरी गंभीर स्वरूपातले रुग्ण आढळत आहेत. काही रुग्णांचा मृत्यूही होत आहे. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसताच तपासणी करून घ्या, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी केले. 

याबाबत डॉ. मोहिते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माळशिरस तालुक्‍यात कोरोना वाढीचा वेग मंदावला असला तरी गंभीर स्वरूपातले रुग्ण आढळत असून काही रुग्णांचा मृत्यूही होत आहे. मृत्यूदर कमी व्हावा यासाठी जास्त त्रास होईपर्यंत न थांबता थोडी लक्षणे दिसताच नागरिकांनी टेस्ट करून घ्यावी, जेणेकरून योग्य पद्धतीने औषधोपचार करता येऊन मृत्यूदर कमी करता येईल. आरोग्य विभागामार्फत दैनंदिन कोरोना टेस्टिंग कॅम्पचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु, या कॅम्पला प्रतिसाद मिळत नाही. रुग्ण स्वतःहून टेस्ट करण्यास पुढे येत नाही. जेव्हा त्रास सुरू होईल तेव्हाच रुग्ण पुढे येत आहेत. आरोग्य विभागातर्फे घेत असलेल्या टेस्ट कॅंम्पमध्ये येऊन स्वतःची टेस्ट करून घ्यावी. 

तालुक्‍यातील अनेक गावांत विशेषतः मेडिकल हब असलेल्या अकलूजमधील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे विविध आजारांनी त्रस्त रुग्ण रुग्णालयात दाखल अथवा औषधोपचारासाठी येत आहेत. अशा सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्या सर्व संशयित रुग्णांची आपल्या स्वतःच्या अथवा कार्यक्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधत कोरोना चाचणी करून रुग्णावर योग्य ते उपचार घडवून आणावेत. चाचणी न करता उपचार सुरू ठेवल्यास रुग्ण गंभीर होऊन त्याच्यावर पुढील उपचार करणे अवघड होत आहे. यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करून घ्यावी आणि मगच उपचार करावा. 

कोरोना संसर्ग कमी झाला म्हणून कोरोनाबाबतची काळजी न घेणे धोकादायक असून कोरोनावर पूर्णपणे मात करावयाची असल्यास सामाजिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन आदींची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहनही डॉ. मोहिते यांनी केले. 

माळशिरस तालुक्‍यात 43 हजार 402 टेस्ट 
आरोग्य विभाग कोरोना प्रादुर्भावाबाबत विविध पातळ्यांवर काम करीत आहे. आजअखेर तालुक्‍यात 32 हजार 292 रॅपिड टेस्ट तर 11 हजार 110 आरटी-पीसीआर अशा एकूण 43 हजार 402 टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण सहा 127 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.15 टक्के व मृत्यूदर 2.08 टक्के आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Mohite said that check for any symptoms of corona