कोरोनामुळे कुंभाराचा व्यवसाय 'लॉक' आणि 'डाऊन' 

रमेश दास
Thursday, 23 April 2020

जगण्याची लढाई अवघड 
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीला माठ, घागरी, रांजण तयार करतो. ग्रामीण भागासह शहरातूनही याला चांगली मागणी असते. मात्र कोरोनामुळे आमचा हा व्यवसायही 'लॉक' आणि 'डाऊन' झाला आहे. त्यामूळे जगण्याची लढाई अवघड झाली आहे. 
- गणेश कुंभार, वाळूज, ता. मोहोळ

वाळूज (ता. मोहोळ, जि. सोलापूर) : कुंभाराच्या चाकाला कोरोनाच्या संकटामुळे ब्रेक लागला असून परिणामी 'गरीबांचा फ्रिज' (माठ) तयार करण्याचे काम गावोगावच्या कुंभारवाड्यात ठप्प झाले आहे. त्यामुळे 'चाकावरचं पोट' असलेल्या कुंभारांच्या समोर जगण्यासह भविष्यातील आर्थिक संकट उभे राहिले आहे. 
भर उन्हाळ्यातील रणरणत्या उन्हात तहान भागविण्यासाठी कुंभाराने तयार केलेल्या डेऱ्यातील (माठ) थंड पाणी पिणे म्हणजे स्वर्गीय सुखाचा अनुभव असतो. फ्रिज पेक्षा नैसर्गिकपणे थंड झालेले पाणी. मात्र माठातील हे पाणी आरोग्यास चांगले असते. ग्रामीण भागात आजही घरोघरी मातीच्या डेऱ्यातील (माठ) थंड पाणी पिले जाते. शेतकऱ्यांच्या शेतातील वस्तीवरील झाडाखाली हे डेरे हमखास दिसतात. मात्र यावर्षी उन्हाळ्याची सुरुवात आणि कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील कुंभारवाड्यात मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या माठ, घागरी, कुथळी, रांजणासह चुलींचे काम बंद झाले. त्यामुळे याच्यावरच कुटूंबाचा चरितार्थ असलेल्या गावोगावच्या कुंभार समाजाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाळूज, देगाव, नरखेड, मसलेचौधरी, मोहोळ यासह मोहोळ तालुक्‍यात आणि जिल्ह्यात गावोगावी कुंभार समाज वर्षानुवर्ष मातीपासून वर्षभर लागणाऱ्या विविध वस्तूंचा पारंपारिक व्यवसाय करीत आहेत. भारतीय संस्कृतीत विविध सण उत्सव साजरे करताना कुंभारांनी तयार केलेल्या वस्तू वापरत असतात. जसेकी गौरी-गणपतीच्या मुर्ती, मकर संक्रांतीला लागणारी सुगडी आणि बोळकी, शेतात पुरले जाणारे मोरवे आणि उन्हाळ्यात पाण्यासाठीचे माठ. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या चुलींचा वापर ग्रामीण भागात घरोघरी आजही होत आहे. भट्टीत तयार झालेला माल गावोगावच्या आठवडा बाजारात जाऊन विकला जातो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यात लागू झालेला लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे कुंभार समाजाचा हा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे त्यांची जगण्याची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Corona the potters business is locked and down