
मकर संक्रांती दिवशी महिला नटून- थटून गावातील विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिराकडे जाताना दिसत होत्या; मात्र या ठिकाणी त्यांनी ओवसा घेणे टाळले. केवळ देवदर्शन केले व कोरोनाच्या काळोखावर सूर्यतेजाने मकर संक्रांती दिनी मात करून सर्वत्र आनंद व चैतन्याचे वातावरण निर्माण होऊ दे, अशी प्रार्थनाही करण्यात आली.
केत्तूर (सोलापूर) : यंदाच्या मकर संक्रांती दिवशी मंदिरांमध्ये ताट व ओवसा वसा घेऊन महिला मंदिरात कमी प्रमाणात आल्याचे दिसून आल्या. दरवर्षीप्रमाणे होणारी महिलांची गर्दीही या वेळी अतिशय कमी होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी भीत- भीतच महिलांनी मात्र ही परंपरा कायम राखली.
मकर संक्रांती दिवशी महिला नटून- थटून गावातील विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिराकडे जाताना दिसत होत्या; मात्र या ठिकाणी त्यांनी ओवसा घेणे टाळले. केवळ देवदर्शन केले व कोरोनाच्या काळोखावर सूर्यतेजाने मकर संक्रांती दिनी मात करून सर्वत्र आनंद व चैतन्याचे वातावरण निर्माण होऊ दे, अशी प्रार्थनाही करण्यात आली. नतंर महिलांनी घरी येऊन घराच्या दैवतांचे दर्शन घेऊन घरासमोर एकमेकींना ओवसा देऊन हळदीकुंकू केले.
नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. या सणामध्ये "तिळगूळ घ्या व गोड गोड बोला' असे म्हणत वर्षाची सुरवात केली जाते. भारत देश हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याला एक तरी सण असतोच. मकर संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होण्यास सुरवात होते. संक्रांतीनंतर गारवा कमी होऊन उष्णता वाढायला सुरू होते. मकर संक्रांती दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती असे म्हणतात. तसेच तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजे मकर संक्रांती. जीवनातील कडवटपणा दूर करण्याच्या उद्देशाने तिळगूळ एकमेकांना दिले जाते. तर भारतीय संस्कृतीमध्ये जवळजवळ सर्व सण महिलांसाठी पर्वणीच असतात. या दिवशी सुवासिनी महिला हळदी- कुंकू देण्या - घेण्याच्या उद्देशाने एकत्रित येतात.
सोशल मीडियाही मकर संक्रांतीच्या दिवशी शुभेच्छांच्या वर्षावाने अक्षरशः फुल झाला होता. मित्र परिवार, शेजारी व नातेवाइकांना सकाळपासूनच गोड गोड शुभेच्छा दिल्या जात होत्या व सौहार्दाचा गोडवा जपत मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला.
संपादन : श्रीनिवास दुध्याल