esakal | पंढरपूरचे विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी पुन्हा बंद ! स्थानिक व्यापारी अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

Vitthal Mandir

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशामुळे श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर सोमवारी (ता. 5) रात्री आठपासून भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर समितीच्या 28 परिवार देवता असून, तिथे देखील भाविकांना 30 एप्रिलपर्यंत बंदी राहणार आहे. 

पंढरपूरचे विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी पुन्हा बंद ! स्थानिक व्यापारी अडचणीत

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशामुळे श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर सोमवारी (ता. 5) रात्री आठपासून भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर समितीच्या 28 परिवार देवता असून, तिथे देखील भाविकांना 30 एप्रिलपर्यंत बंदी राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 

मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 17 मार्चपासून श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. तब्बल आठ महिने मंदिर भाविकांसाठी बंद केले गेल्याने पंढरपूर शहरातील अर्थकारणाला त्याचा फार मोठा फटका बसला होता. मंदिर बंद ठेवण्यात आल्याने विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरला येणेही बंद झाले होते. त्यानंतर शासनाच्या परवानगीने 14 नोव्हेंबरपासून मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखदर्शनासाठी मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे हळूहळू भाविक पुन्हा पंढरपूरला येऊ लागले होते. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाने भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार सोमवारी रात्री आठपासून मंदिरात भाविकांना सोडणे बंद करण्यात आले आहे. 

30 एप्रिलपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले असले तरी "श्रीं'चे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहणार आहेत. त्याच्या स्वरूपात किंवा पद्धतीत कोणताही बदल अथवा व्यत्यय न आणता मंदिरात दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येणार आहेत. इतर सण, उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 

दरम्यान, मागील वर्षी मंदिर बंद राहिल्याने अडचणीत आलेले स्थानिक व्यापारी सोमवारी रात्रीपासून पुन्हा मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असल्याने चिंतेत आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी जागा भाड्याने घेऊन दुकाने थाटलेली आहेत. प्रासादिक वस्तूंसह अन्य वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणारे अनेक स्थानिक व्यापारी मंदिर बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत. 

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर मंदिर परिसरातील बाजारपेठ अवलंबून आहे. मंदिरात भाविकांना प्रवेशबंदी करण्याऐवजी सोशल डिस्टन्सिंग ठेवून भाविकांना प्रवेश दिला, तर येथील व्यापाऱ्यांची अडचण काही प्रमाणात तरी दूर होईल. 
- कौस्तुभ गुंडेवार, 
स्थानिक व्यापारी, पश्‍चिमद्वार, पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल