
मोहोळ (सोलापूर) : तालुक्यातील आठ महसूल मंडळातील 171 आलेल्या हरकतींचा निकाल लावून सोमवारी (ता. 14) 76 ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गल्ली-बोळातील व पुढाऱ्यांच्या घरांतील गुपचूप बैठकांना व मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
मोहोळ तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मोठे बागायती क्षेत्र असल्याने गावातील अनेक नागरिक शेतात राहायला गेले आहेत. मात्र ते सकाळ-संध्याकाळ गावात या ना त्या कारणाने तासन्तास हजेरी लावत आहेत. आपलेच आरक्षण पडणार, या हिशेबाने शर्यती लावणे सुरू झाले आहे. ढाब्यावर जेवणावळी सुरू झाल्या आहेत, तर ढाबा चालकांनी येणाऱ्यांसाठी ढाब्याच्या पाठीमागे बसण्याची खास व्यवस्था केली आहे.
सध्या महाविकास आघाडीचे सरकार असल्याने गाव पातळीवरच्या आघाड्या कशा होतात, हे ही पाहणे गरजेचे आहे. चालू निवडणुकीपूर्वी शासनाने एका आघाडीतून निवडून येऊन दुसऱ्या आघाडीत जाता येणार नाही, हा नियम केल्याने कुंपणावर असलेल्यांची मोठी पंचाईत झाली आहे. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा वरचष्मा होता. भीमा परिवारानेही मुसंडी मारली होती तर भाजपनेही खाते उघडले होते.
सध्या अनेकांनी गावातील नेतेमंडळींच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. विवाह सोहळे, बारसे व किरकोळ कार्यक्रमांनाही वर्षभर न फिरकलेले व ओळखही न दाखवलेले नेते आवर्जून हजेरी लावताना दिसत आहेत.
या निवडणुकीत माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, सतीश काळे, माजी उपसभापती मानाजी माने, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख चरणराज चवरे यांच्यासह अन्य नेत्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.