अतिवृष्टीने उडाली मंगळवेढ्यात दाणादाण ! व्यापारी गाळ्यात पाणी शिरल्याने लाखों किंमतीच्या साहित्याचे नुकसान

हुकूम मुलाणी
Thursday, 15 October 2020

तालुक्यात माळवद असलेली घरांची पडझड झाली. पिके पाण्यात गेली आहेत. बहुतांश गावाला जोडणारे रस्ते देखील बंद झाले.

मंगळवेढा (सोलापूर) : दमदार पावसाच्या हजेरीने पाऊस नको असे म्हणण्याची वेळ आली आहे. सलग पडलेल्या पावसामुळे शहरात असलेल्या नगरपालिकेच्या गैबीपीर व्यापारी गाळ्यात पाणी आल्यामुळे व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले. कोरोनामुळे अडचणीत आलेला व्यापारी आता पावसामुळे अधिकच अडचणीत आला.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना महसूल प्रशासनाने दिल्या होत्या. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित जागेचा आसरा घेतला. तालुक्यात माळवद असलेली घरांची पडझड झाली. पिके पाण्यात गेली आहेत. बहुतांश गावाला जोडणारे रस्ते देखील बंद झाले.

सहा महिन्यापासून कोरोनामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी आता कोरोना विसरत आता पावसापासून बचाव करण्यासाठी स्वतःचा जीव, जनावरे वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले, अशा परिस्थितीत शहरातील व्यापारी गाळ्यामध्ये चित्राच्या पावसाने तळघरातील गाळ्यात पाणी शिरले आहे. त्यात मालाचे व महत्त्वाच्या साहित्याचे नुकसान झाले.

शहरातील बँका पतसंस्थांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेले व्यापारी सहा महिन्यापासून कोरोनाच्या संकटामुळे अधिकच अडचणीत आला. त्यामुळे त्यांना बँकाकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते नगरपालिकेचे भाडे आणि कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ना बँकेने दिलासा दिला, ना पालिकेने आधार दिला, नगरपालिकेचे भाडे भरण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

अशा परिस्थितीत काही संघटनांनी या काळातील व्यापारी गाळ्याचे भाडे माफ करावे, अशी मागणी केली. परंतु पालिका प्रशासनाने सकारात्मक विचार केला नाही, अशा परिस्थितीत आता पावसाचे पाणी गाळ्यात आल्यामुळे हा व्यापारी आणखीनच अडचणीत आला.

काही व्यापाऱ्यांनी हे पाणी काढण्यासाठी रात्र जागून काढली. तर काही व्यापाऱ्यांनी जीवाच्या भितीने नुकसान झालेले बरे अशी मानसिकता केली. नगरपालिका प्रशासनाने पाण्याची विल्हेवाट तातडीने लावावी. खासगी मालकाच्या गाळ्यातही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने त्याचे नुकसान झाले, या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to heavy rains in Mangalwedha village water has infiltrated in the trade shops