
राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे, घरांचे व जनावरांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे होऊन सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये नुकसान भरपाई बाबतीत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया चालू झाली असली, तरी धर्मपुरी (ता. माळशिरस) येथील अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्या लाभार्थींना मात्र तलाठी व ग्रामसेवक यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.
धर्मपुरी (सोलापूर) : राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे, घरांचे व जनावरांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांनी नुकसानग्रस्त शेतीच्या, घरांच्या व जनावरांच्या नुकसानी संदर्भातील पंचनामे करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले होते. त्यानुसार तत्काळ पंचनामे होऊन सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये नुकसान भरपाई बाबतीत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया चालू झाली असली, तरी धर्मपुरी (ता. माळशिरस) येथील अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्या लाभार्थींना मात्र तलाठी व ग्रामसेवक यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. त्यानुसार धर्मपुरी (ता. माळशिरस) येथील ग्रामसेवकांनी अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्यांचे पंचनामे करून गाव कामगार तलाठी यांच्याकडे जमा केले. परंतु गाव कामगार तलाठी यांनी हे पंचनामे प्रशासनाकडे जमा न करता दहा दिवसांच्या कालावधीनंतर संबंधित ग्रामसेवक यांच्याकडे मुदतबाह्य पंचनामे असल्याने स्वीकारता येत नसल्याचे कारण सांगून परत केले. यामुळे गाव कामगार तलाठी तसेच ग्रामसेवक यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्या लाभार्थींना भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे.
अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्याचे पंचनामे त्वरित केले गेले. परंतु गाव कामगार तलाठी आठ दिवस उपस्थित नव्हते. शेवटी मोरोची येथे जाऊन पंचनामे जमा करण्यात आले. मुदतीबाबत कोणतीही लेखी अथवा तोंडी सूचना देण्यात आली नाही.
- बी. एस. गोरे, ग्रामसेवक, धर्मपुरी, ता. माळशिरस
संपादन : श्रीनिवास दुध्याल