उपरी येथील ग्रामपंचायतीच्या भूखंडावर स्थानिकांचा डल्ला ! पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले 

भारत नागणे 
Monday, 14 September 2020

उपरी येथील सध्याची पाणीपुरवठा करणारी टाकी जीर्ण झाली असून, ती गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे गावची नळपाणी पुवरठा योजनाही बंद पडली आहे. जीवन प्राधिकरण योजनेतून सुमारे 43 लाख रुपयांची नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. कामाचे रीतसर टेंडर देखील झाले आहे. परंतु पाण्याच्या टाकीसाठी योग्य जागा मिळत नसल्याने पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : सार्जनिक नळ पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाकीसाठी जागा मिळत नसल्याने उपरी (ता. पंढरपूर) येथील पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या अनेक मोक्‍याच्या जागांवर अतिक्रमण झाल्याने पाणी पुरवठ्याच्या टाकीसाठीच जागा मिळत नसल्याने गावचे कारभारी आता हतबल झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमणे काढून त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचे काम सुरू करावे, अशी मागणी उपसरपंच अण्णासाहेब नागणे यांनी केली. 

उपरी येथील सध्याची पाणीपुरवठा करणारी टाकी जीर्ण झाली असून, ती गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे गावची नळपाणी पुवरठा योजनाही बंद पडली आहे. जीवन प्राधिकरण योजनेतून सुमारे 43 लाख रुपयांची नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. कामाचे रीतसर टेंडर देखील झाले आहे. परंतु पाण्याच्या टाकीसाठी योग्य जागा मिळत नसल्याने पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. 

ग्रामपंचायतीच्या अनेक मोक्‍याच्या जागांवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शासकीय योजनांसाठी खुद्द ग्रामपंचायतीवरच "कुणी जागा देता का... जागा' असे म्हणण्याची वेळी आली आहे. येथील गायरान (शासकीय) जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न जटील असतानाच ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमणाचा वाद आता नव्याने समोर आला आहे. 

ग्रामपंचायतीच्या मालकीचे काही भूखंड शिल्लक आहेत. परंतु स्थानिक लोकांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. तर काही मोकळ्या जागांवर बेकायदेशीरपणे (मालकी) हक्क सांगितला जात आहे. त्यामुळे शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना ग्रामपंचायतीच्या नाकीनऊ येताना दिसत आहे. अतिक्रमण काढण्याबाबत ग्रामपंचायतीने अद्याप तरी कोणासही कायदेशीर नोटीस देण्याची साधी तसदी देखील घेतली नाही. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या लोकांचेही चांगलेच फावले आहे. येत्या काळात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सत्ताधारी कोणता धाडसी निर्णय घेतात, याकडेच ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to lack of space at Upari the work of water supply scheme was not completed