करमाळ्यात स्टॅम्पचा तुटवडा; विक्रेत्यांकडे लागल्या रांगा 

अण्णा काळे 
Monday, 31 August 2020

पीक कर्जासाठी बॅंकांमध्ये 100 रुपयांच्या मुद्रांकाची मागणी केली जात आहे. मात्र वेळेत मुद्रांक मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामीण भागातून शेतकरी मुद्रांक मिळावा म्हणून तहसील कार्यालयात येत आहेत. त्यामुळे मुंद्राक विक्रेत्यांसमोर मोठी गर्दी होत असून जादा 100 रुपयांच्या मुद्रांकासाठी 110 रुपये द्यावे लागत आहेत. तरीही मुद्रांक मिळत नसल्याचे चित्र आहे. 

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात मुद्रांकचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुद्रांक खरेदीसाठी ज्या मुद्रांक विक्रेत्यांकडे स्टॅम्प उपलब्ध आहेत त्यांच्या दुकानासमोर सकाळपासूनच लोकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र करमाळा तहसीलदार आवारातील मुद्रांक विक्रेत्यांकडे दिसून आले. 

सध्या पीक कर्जासाठी शेतकरी बॅंकेत जाते आहेत. पीक कर्जासाठी बॅंकांमध्ये 100 रुपयांच्या मुद्रांकाची मागणी केली जात आहे. मात्र वेळेत मुद्रांक मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामीण भागातून शेतकरी मुद्रांक मिळावा म्हणून तहसील कार्यालयात येत आहेत. त्यामुळे मुंद्राक विक्रेत्यांसमोर मोठी गर्दी होत असून जादा 100 रुपयांच्या मुद्रांकासाठी 110 रुपये द्यावे लागत आहेत. तरीही मुद्रांक मिळत नसल्याचे चित्र आहे. 

कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यातून सावरण्यासाठी पीककर्ज काढले जात आहे. यासाठी अनेक बॅंकाही पुढे आल्या आहेत. कर्ज प्रकरणासाठी 100 रुपयांचे मुद्रांक आवश्‍यक असते. कर्जाच्या प्रमाणात बॅंकेचे व्यवस्थापक शेतकऱ्यांना मुद्रांक आणण्यासाठी सांगतात. मात्र, केवळ मुद्रांक वेळेत न मिळाल्याने शेतकरी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. करमाळ्यात नऊ मुद्रांक विक्रेत्यांपैकी सर्वांकडेच स्टॅम्प संपल्याने नागरिकांची अडचण होत आहे. 

कोषागार विभागात मुद्रांक उपलब्ध नसल्याने स्टॅंप विक्रेत्यांकडे मुद्रांक उपलब्ध होत नसल्याचे एका मुद्रांक विक्रेत्यांने सांगितले. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. एका, दोघा स्टॅंप विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेले स्टॅम्प घेण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने मुद्रांक विक्रेते देखील वैतागले आहेत. सध्या पीककर्ज, ऍडमिशन, वीज कनेक्‍शन, घरकुल, संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे यासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्पची मोठी मागणी आहे. तरी लवकरात लवकर स्टॅम्प उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत. 

उमरड (ता. करमाळा) येथील पंढरीनाथ गिरीगोसावी म्हणाले, मला पीककर्ज काढण्यासाठी दोन 100 रुपयांच्या स्टॅम्पची गरज होती. मी दोन दिवस करमाळ्याला जात होतो. पण मला स्टॅम्प मिळाले नाहीत. एका स्टॅम्प विक्रेत्याकडे स्टॅम्प होते पण त्यांची विक्री एक वाजताच बंद झाली. त्यामुळे मला गुरुवार, शुक्रवार सलग दोन दिवस करमाळ्याला जाऊनही स्टॅम्प मिळाले नाहीत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to shortage of stamp in Karmala, queues of citizens at stamp vendors to get stamp