भारतनानारूपी तालुक्‍याचा आधारवड गेल्याने मंगळवेढा पोरका झाल्याची भावना

हुकूम मुलाणी 
Sunday, 29 November 2020

स्व. आमदार भालके यांचे शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान पुणे येथे निधन झाले. काल त्यांचे पार्थिव शरीर मंगळवेढ्यात आल्यानंतर उपस्थितीत जनसमुदाय हा त्यांच्या जनसंपर्काचा साक्ष ठरला.

मंगळवेढा (सोलापूर) : आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे मंगळवेढ्यात अजूनही शोककळा असून, दुसऱ्या दिवशीही शहर व ग्रामीण भागात भालके यांच्या अकाली जाण्यावर चर्चा सुरू आहे. तालुक्‍यात बहुतांश गावांत शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

स्व. आमदार भालके यांचे शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान पुणे येथे निधन झाले. काल त्यांचे पार्थिव शरीर मंगळवेढ्यात आल्यानंतर उपस्थितीत जनसमुदाय हा त्यांच्या जनसंपर्काचा साक्ष ठरला. 11 वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या चुलीशी निगडित संबंध ठेवल्यामुळे त्यांच्या अकाली जाण्यावर गोरगरीब दुःखातून सावरले नाहीत. प्रामाणिक कार्यकर्त्याच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्याला उच्चशिक्षित केले.

जनतेच्या कोणत्याही कार्याला हजेरी नजरेत भरणारी होती. मतदारसंघातील कुटुंबांमध्ये एखादा आघात झाल्यानंतर त्या कुटुंबाला तातडीने आर्थिक व संसारिक मदत देताना आपला हात नेहमी ढिला सोडला. खिशात हात घातल्यानंतर हाताला किती लागतील याचा विचार त्यांनी कधीच केला नाही; पण समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासाठी त्यांनी ११ वर्षांची आमदारकी पणाला लावली. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2009 सारखीच परिस्थिती निर्माण झाली. नेते एका बाजूला गेले आणि सर्वसामान्य मतदार मात्र आमदार भालके यांच्या पाठीशी उभा राहिला. म्हणून खासगीत बोलताना 'दलबदलू कार्यकर्त्यांपेक्षा सर्वसामान्य गोरगरीब मतदारांनी मला मोठी ताकद दिल्यामुळे मी त्यांचा आमदार आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी कधी पण, कुठे पण माझी आमदारकी पणाला लावण्यास तयार आहे' असे बोलून दाखवत. 

खंडित वीज पुरवठापासून ते तहसील, पंचायत समिती व पोलिस स्टेशनच्या कामासाठी वाडी-वस्तीवरील सर्वसामान्य नागरिक त्यांना फोनवर त्यांच्या अडचणी सांगून सोडवून घेत. त्यांच्या संपर्क कार्यालयात येऊन भेटण्यापेक्षा फोनवर आपले काम होते, असा आमदार आपल्याला मिळाल्याचे समाधान तालुक्‍यातील जनतेला होते. परंतु त्यांच्या अकाली जाण्याने मात्र हे सर्व काही हिरावून घेतले आहे. त्यामुळे काल दिवसभर सोशल मीडियात असलेली क्रेझ आज दुसऱ्या दिवशी तशीच होती. सोशल मीडिया व वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असला तरी त्यांच्या अकाली जाण्याची सल मात्र तालुक्‍याला कायम राहिली आहे. 

परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भालके यांच्या जाण्याने मतदारसंघ पोरका झाला असला तरी हे महाविकास आघाडी सरकार मतदारसंघाला आधार देईल, त्यांच्या वारसदाराबाबत योग्य वेळ येईल. त्यावेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असा आधार दिल्यामुळे समर्थक आशादायक आहेत. असले तरी भालके यांच्या जाण्याने लागलेली सल मात्र ग्रामीण जनतेच्या मनात कायम राहणार.

संपादन - सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the untimely demise of MLA Bharat Bhalke, a mourning meeting has been organized on Mangalwedha