तीस दिवसानंतरही शिक्षकांना मिळेना कार्यमुक्‍ती ! महापालिकेचे शिक्षक संघटनांकडे बोट 

तात्या लांडगे
Wednesday, 16 September 2020

सोलापूर : शहरातील खासगी शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग आणि मनपा शिक्षण मंडळातील तीन हजार 803 शिक्षकांना कोरोना ड्यूटी देण्याचे नियोजन महापालिकेने केले. त्यापैकी सुमारे साडेचारशे शिक्षकांना पूर्वीचे आजार असून त्यांचे वय 50 वर्षांहून अधिक आहे. 30 दिवसांची कोरोना ड्यूटी करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी या शिक्षकांना दिले. मात्र, 30 दिवसांहून अधिक काळ ड्यूटी करुनही तब्बल 278 शिक्षकांना कार्यमुक्‍त केलेले नाही. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइनच्या माध्यमातून पोहचता आलेले नाही. 

शाळा बंद असताना सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने शिक्षक पोहचून शिक्षण देत आहेत. मात्र, त्यांना कोरोना ड्यूटी दिल्याने दररोज चार तासांहून अधिक काम करुन पुन्हा विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागते. काहीजण ड्यूटी करताना बाधितही झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याची तयारी करणे, त्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून कनेक्‍ट करणे, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वेळेतच विद्यार्थ्यांकडील मोबाइलची उपलब्धता पाहून त्यांच्या सोयीने वेळ ठरवून शिक्षणाचे धडे देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे महापालिका आयुक्‍तांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर शिक्षक घाबरून कोरोना ड्यूटीवर गेले. 30 दिवसांचा कालवधी पूर्ण केल्यानंतर कार्यमुक्‍त केले जाईल, असे तत्कालीन उपायुक्‍त पंकज जावळे यांनी पत्र काढले. तर शासनाकडून शिक्षकांना कोरोनाची ड्यूटी देऊ नये, अशा सूचनाही आल्या. तरीही शिक्षकांना कार्यमुक्‍त करण्यात आलेले नाही. आता सर्व नियोजन शिक्षक संघटना करीत असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे यांनी दिले आहे. 

वशिलेबाजी अन्‌ पैशांची देवाणघेवाण 
शहरातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे अनेकांना कोरोनाची भिती वाटत असल्याने त्यांनी कोरोनाची ड्यूटी येण्यापूर्वीच अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे वशिलेबाजी सुरू केली आहे. दुसरीकडे आलेली ड्यूटी रद्द करण्यासाठी महापालिकेतील अधिकारी तथा कर्मचारी पैशांची मागणी केली जात असल्याचे काही शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 30 दिवसांनंतरही ड्यूटी रद्द होत नसल्याने अनेक शिक्षक महापालिकेत दररोज हेलपाटे मारत आहेत.

शिक्षक संघटनांकडे सोपविले नियोजन
शहरात घरोघरी जाऊन को-मॉर्बिड व्यक्‍तींचा सर्व्हे सुरू आहे. प्रत्येक शिक्षकांनी किमान 30 दिवसांची ड्यूटी करणे आवश्‍यक आहे. ड्यूटीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना कार्यमुक्‍त केले जाते. शिक्षक संघटनांशी चर्चा करुन आता शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांना ड्यूटी दिली जाते. 
- धनराज पांडे, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As the duty is not canceled even after 30 days, many teachers are going to the Municipal Corporation every day