बारावीत इंग्रजीमध्ये फक्त 35 मार्क, पण आता इंग्रजीमध्येच डॉक्‍टरेट ! शिरनादंगीतील युवकाचा प्रेरणादायी प्रवास 

बिराप्पा करे 
Monday, 7 September 2020

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याच जिद्दीने व जोमाने पुढे परमेश्‍वर थोरबोले यांनी पीएचडीसाठी इंग्रजी अधिविभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ. प्रभंजन माने (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू केले. दरम्यानच्या काळामध्ये ते सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी Racial Consciousness in Andrea Levy's Novels : A Study या विषयामध्ये पीएचडी पदवी संपादन केली. 

पाठकळ (सोलापूर) : घरी शिक्षणाची कोणतीच पार्श्वभूमी नाही. अशा खडतर व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एका सामान्य शेतकऱ्याच्या तरुण मुलाने म्हणजेच परमेश्वर बिरा थोरबोले यांनी संशोधनाची जिज्ञासा व आस ठेवून इंग्रजी विषयातील डॉक्‍टरेट जी की मिळवण्यासाठी अनेकांना उतारवयात जावे लागते; मात्र यांनी अशी ही प्रतिष्ठित डॉक्‍टरेट पदवी अवघ्या तिसाव्या वर्षी मिळवली. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते डॉक्‍टरेट असा झालेला त्यांचा संघर्षमय प्रवास आजच्या तरुणाईला प्रेरणादायी ठरणारा असा आहे. 

मंगळवेढा तालुक्‍याच्या दक्षिणेला शेवटच्या टोकाला असलेलं कायम दुर्लक्षित व दुष्काळी शिरनांदगी हे त्यांचं गाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरनांदगीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून झाले. माध्यमिक शिक्षण भैरवनाथ विद्यालय, शिरनांदगी येथून झाले. उच्च माध्यमिक शिक्षण श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा येथून झाले. त्यांना बारावीला इंग्रजी विषयाला फक्त 35 गुण होते. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवास खडतर होता. परंतु त्यांनी तीच गोष्ट आपला कमकुवत गुण न मानता, स्वयंप्रेरणेने पुढे श्री संत दामाजी महाविद्यालयात बीए भाग एकसाठी इंग्रजी ऐच्छिक विषय ठेवून प्रवेश घेतला. तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये जिद्दीने व मेहनतीने इंग्रजी विषय पक्का बनवला. त्याच परिश्रमाचे 
फळ म्हणजे ते श्री संत दामाजी महाविद्यालयातून पदवी परीक्षेत स्पेशल इंग्रजी विषयात प्रथम आले. त्यांना या यशाबद्दल प्राचार्य डॉ. एन. बी. पवार, प्रा. एच. आर. नागटिळक, डॉ. संजय शिवशरण यांचे मार्गदर्शन लाभले. पुढे त्यांनी पदव्युत्तरचे शिक्षण इंग्रजी अधिविभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पूर्ण केले. 

आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याच जिद्दीने व जोमाने पुढे त्यांनी पीएचडीसाठी इंग्रजी अधिविभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ. प्रभंजन माने (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू केले. दरम्यानच्या काळामध्ये ते सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी Racial Consciousness in Andrea Levy's Novels : A Study या विषयामध्ये पीएचडी पदवी संपादन केली. सध्या ते श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा येथे इंग्रजी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या संशोधनामध्ये त्यांना डॉ. माने यांचे वेळोवेळी गुणवत्तापूर्ण व मोलाचे मार्गदर्शन मिळाले. 

त्यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. ए. एम. सरवदे, डॉ. जी. बी. कोळेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच त्यांच्या या यशाबद्दल संस्था समन्वयक राहुल शहा, सचिव किसन गवळी, रमेश जोशी, प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, उपप्राचार्य सदाशिव कोकरे, पर्यवेक्षक राजेंद्र गायकवाड, एच. आर. नागटिळक, डॉ. संजय शिवशरण यांनी अभिनंदन केले. 

या यशाबद्दल बोलताना डॉ. परमेश्वर थोरबोले म्हणाले, उच्च शिक्षण घेत असताना प्रत्येक पावलाला मला संघर्ष करावा लागला. पण तो संघर्ष जर तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून घेतला तर जगण्याला बळ मिळून जीवन आनंदी होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At an early age Parmeshwar Thorbole received his doctorate in English