अकलूज, यशवंतनगर, संग्रामनगरमध्ये आठ दिवसांचा कडक लॉकडाउन

शशिकांत कडबाने
Wednesday, 9 September 2020

परिस्थिती कठीण म्हणून लॉकडाउन 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील गेल्या पाच महिन्यापासून असलेल्या लॉकडाउनमुळे अकलूजमधील छोटे व मध्यम व्यापारी पूर्ण लयास गेले असून आता आणखी लॉकडॉउन लादने योग्य नाही. तरीही परिस्थितीमुळे घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या शितलदेवी मोहिते पाटील यांनी केले. 

अकलूज (सोलापूर) : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता अकलूज, यशवंतनगर व संग्रामनगर या गावात शुक्रवारपासून आठ दिवस कडक लॉकडाउन पाळण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी शमा पवार यांनी दिली. 
अकलूज येथे प्रांताधिकारी शमा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व व्यापारी असोसिएशन व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने शुक्रवार (ता. 11) ते शुक्रवार (ता. 18) दरम्यान फक्त दूध व औषध पूरवठा सोडून इतर सर्व प्रकारची व्यापारी संकुले बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शितलदेवी मोहिते पाटील, सुनंदा फुले, तहसीलदार अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर, फातिमा पाटावाला, वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते यांच्यासह विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 
माळशिरस तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. अकलूज येथील कोरोनाबाधितांची संख्या 461 वर गेली आहे. तर यशवंतनगर येथे 116 तर संग्रामनगर येथे 78 रूग्ण आढळले आहेत. कोरोना रूग्णांची साखळी शोधणे, टेस्ट घेणे व विलगीकरण करणे गरजेचे असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यानुसार उपस्थित व्यापारी असोशिएशन प्रतिनिधींनी आठ दिवस कडक बंद पाळण्याचा निर्णय घेतला. याकाळात फक्त दूध व औषधांची दुकाने उघडी राहतील. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील गेल्या पाच महिन्यापासून असलेल्या लॉकडाउनमुळे अकलूजमधील छोटे व मध्यम व्यापारी पूर्ण लयास गेले असून आता आणखी लॉकडॉउन लादने योग्य नाही. तरीही परिस्थितीमुळे घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या शितलदेवी मोहिते पाटील यांनी केले. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight days of strict lockdown in Akluj Yashwantnagar Sangramnagar