पंढरपुरातील 'त्या' वक्तव्यानेच एकनाथ खडसेंच्या भाजपमधील कारकिर्दीला घरघर 

भारत नागणे
Wednesday, 21 October 2020

शेवटी पक्ष सोडताना खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवूनच भाजपला रामराम केला. गेल्या सहा वर्षाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्षाला आज त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेने पूर्णविराम मिळाला. 

पंढरपूर (सोलापूर) : भाजप वाढीपासून ते राज्यात सत्तेचा सोपान चढेपर्यंत सलग 40 वर्षे पक्षासोबत सावलीसारखे राहणाऱ्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या महापुजेवेळी केलेले राजकीय वक्तव्य त्यांना भोवले होते. त्या वक्तव्यानंतर सहा वर्षांनी त्यांना भाजप सोडून राष्ट्रवादीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश करावा लागला आहे. खडसे यांनी त्यावेळी आपल्या भावनेला वाट मोकळी करुन दिली नसती तर कदाचीत ते आज पक्षात कायम राहिले असते, अशी चर्चा राजकीय विश्वात रंगली आहे. 

राज्यात 2014 च्या निवडणूकीनंतर भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले. ज्येष्ठ म्हणून आपणास मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. परंतु, भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तेव्हाच श्री. खडसे काहीसे नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे महसूल, कृषी, उत्पादन शुल्क अशी महत्वाची सहा ते सात खाती देण्यात आली होती. महसूलमंत्री पद असल्याने एकनाथ खडसेंना प्रथमच पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रुक्‍मिणीची महापूजा करण्याची संधी मिळाली होती. खडसे कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना बहुजनाचा मुख्यमंत्री झाला असता तर मला आनंद झाला असता असे सूचक वक्तव्य करुन मुख्यमंत्री पद न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यावेळी भाजपात मोठी खळबळ उडाली होती. 

त्यांच्या याच वक्तव्यावरुन मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीसही चांगलेच नाराज झाले होते. परंतु त्यांनी कधीही त्यांच्याबद्दलची नाराजी उघडपणे बोलून दाखवली नाही. त्यानंतरच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय दरी वाढत गेली. साधारण एका वर्षातच एकनाथ खडसे यांच्यावर अनेक आरोप झाले. आरोपानंतरच त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांचे ते वक्तव्यच त्यांना शेवटपर्यंत अडचणीचे ठरले. सर्व आरोपामधून त्यांची निर्दोषमुक्तता झाल्यांतरही त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील खडसेंना डावलण्यात आले. खडसेंनी अनेकवेळा फडणवीस यांच्याविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. 

शेवटी पक्ष सोडताना खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवूनच भाजपला रामराम केला. गेल्या सहा वर्षाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्षाला आज त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेने पूर्णविराम मिळाला. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse career in the BJP was hampered by his statement in Pandharpur