वाळूज, देगाव परिसरातील ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांची निवड होणार मंगळवारी

The election of Gram Panchayat stewards in Waluj Degaon area will be held on Tuesday
The election of Gram Panchayat stewards in Waluj Degaon area will be held on Tuesday

वाळूज (सोलापूर) : वाळूज, देगाव, मनगोळी/भैरववाडी, यल्लमवाडी, सय्यदवरवडेसह मोहोळ तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांची निवड मंगळवारी (ता.९) तर उर्वरीत २३ ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांची निवड गुरुवारी (ता.११) होणार आहे. सत्ता आपलीच आणण्यासाठी गावोगावच्या परस्पर विरोधी गटांचे सदस्य पळवापळवीसह मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

पक्षबंदी कायदा ग्रामपंचायतीला लागू होत नसल्याने आपलीच सत्ता यावी, म्हणून सदस्य फोडाफोडी, पळवापळवी कार्यक्रमाला वेग आला आहे. आपल्या गटाचे सदस्य अमिषाला बळी पडून फुटून जाऊ नयेत, म्हणून गावातील दोन्ही गटांनी आपापले नवनिर्वाचीत सदस्य अज्ञात स्थळी हलवले आहेत. या नवनिर्वाचीत सरस्यांचीही मुंबई, गोवा, कोकण, पुणे सहल मौज मजेत सुरु आहे.

सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचाची निवड ९ फेब्रुवारीला, तर उर्वरित २३ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड ११ फेब्रुवारीला होणार आहे, असे तहसीलदार जीवन बनसोडे व निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी जाहीर केले आहे. एकूण ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी १३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ६३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. मतमोजणी नंतर बऱ्याच ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत युवाशक्तीने सत्ता परिवर्तन केले आहे.

प्रशासनाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर केल्याने सुरुवातीला अनेकांची निराशा झाली. यामुळे अनेकांना आनंदही झाला. सदस्यांची पळवापळवी जोरात सुरू असून सदस्य फुटू नयेत, म्हणून परस्पर विरोधी गटांनी आपापले निवडून आलेले सदस्य गुप्त ठिकाणी हलवले आहेत. त्यातच मुरब्बी नेत्यांनी नवनिर्वाचीत सदस्यांचे मोबाईल बंद असल्याने फोडाफोडीस अडथळा निर्माण होत आहे.

वाळूज (ता.मोहोळ) ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत ९ पैकी ९ जागा जिंकून कादे गटाने एकहाती 'विजय' मिळविला आहे. शंभर टक्के सत्ता परिवर्तन झालेल्या गटाला पळवा पळवीची भिती नसल्याने अशा एकहाती विजय मिळविलेल्या गावांमध्ये कार्यकर्ते मिरवणुकीच्या तयारीला लागले आहेत.

वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींच्या सरपंच निवड कार्यक्रमासाठी पुढील अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. 
१) वाळूज(दे)- श्रीम.शोभा महादेव येळके(पर्यवेक्षक), २) देगाव(वा)- कल्पना दुर्गाप्पा झंपले(पर्यवेक्षक), ३) मनगोळी / भैरववाडी- श्रीम.वासंती सुभाष सुरवसे (पर्यवेक्षक), ४) यल्लमवाडी - सुवर्णा सिद्धाराम माशाळे(पर्यवेक्षक), ५) सय्यद वरवडे-पी.आर.राठोड(कनिष्ठ अभियंता)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com