esakal | सरपंच एका गटाचा, उपसरपंच दुसऱ्याचा ! पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडी; सोयीनुसार आघाड्या

बोलून बातमी शोधा

Sarpanch}

पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी शुक्रवारी झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांच्यामुळे भाजपने तर आमदार (कै.) भारत भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली होती. 

सरपंच एका गटाचा, उपसरपंच दुसऱ्याचा ! पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडी; सोयीनुसार आघाड्या
sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी शुक्रवारी झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांच्यामुळे भाजपने तर आमदार (कै.) भारत भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली होती. त्यामुळे अनेक गावात परिचारक गटाचे तर काही गावांत काळे आणि भालके गटाच्या सदस्यांना सरपंच व उपसरपंचपदाची संधी मिळाली. 

काही गावांत सोयीनुसार आघाड्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या गावांमध्ये सरपंच एका पक्षाचे नतृत्व मानणारा तर उपसरपंच दुसऱ्या पक्षाचे नेतृत्व मानणारा, अशी अवस्था दिसत आहे. रोपळेत गणपूर्ती अभावी सभा तहकूब करण्यात आली. अजनसोंडमध्ये निवड प्रक्रिया पारदर्शी झाली नाही, अशी तक्रार करण्यात आली तर सोनके येथे दोन सदस्यांना निवड प्रक्रियेत भाग घेण्यास मनाई करण्याची मागणी झाल्याने काही वेळ गोंधळ झाला. 

तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी केवळ जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. जैनवाडीत सरपंचपदी रुक्‍मिणी गोफणे यांची तर उपसरपंचपदी अशोक सदलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावांतील भालके, परिचारक आणि काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपापल्या सोईनुसार स्थानिक पातळीवर आघाड्या केल्या होत्या. अनेक गावांत चुरशीने आणि अटीतटीने मतदान झाले होते. तीच चुरस सरपंच, उपसरपंच निवडीच्या वेळी देखील दिसून आली. 

परिचारक यांच्या खर्डी गावात परिचारक, भालके व काळे गटाने सर्व 11 जागा जिंकल्या होत्या. तिथे परिचारक गटाच्या मनीषा भगवान सवाशे यांची सरपंचपदी तर शरद श्‍यामराव रोंगे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार (कै.) भारत भालके यांच्या सरकोली गावात भालके, काळे गटाचे शिवाजी दगडू भोसले आणि भास्कर सुरेश भोसले हे अनुक्रमे सरपंच आणि उपसरपंच म्हणून विजयी झाले. 

बाभूळगाव येथे परिचारक गटाचे कट्टर समर्थक पांडुरंग कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांच्या सून ज्योती गणेश चव्हाण यांची सरपंचपदी तर श्रीपाद वसंत चव्हाण यांना उपसरपंचपदी संधी देण्यात आली. करकंब येथे गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. तिथे तेजमाला शरदचंद्र पांढरे व आदिनाथ नरहरी देशमुख हे अनुक्रमे सरपंच आणि उपसरपंचपदी म्हणून विजयी झाले. नारायण चिंचोली येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण धनवडे यांच्या पत्नी नर्मदा लक्ष्मण धनवडे यांची तर उपसरपंचपदी गहिनीनाथ चव्हाण यांची निवड झाली. 

सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या वाडीकुरोली गावात ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व नऊ महिला विजयी झाल्या होत्या. त्यामुळे कोणाला गावचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार, याविषयी उत्सुकता होती. सरपंच म्हणून अर्चना धनंजय काळे यांना तर उपसरपंच म्हणून अर्चना राजेंद्र काळे यांची वर्णी लागली. 

रोपळेत सभा तहकूब, अजनसोंडमध्ये तक्रार 
रोपळे येथे सभेसाठी आवश्‍यक गणपूर्ती न झाल्याने निवडीची सभा तहकूब करण्यात आली. उर्वरित सर्व गावांत निवडीची प्रक्रिया पार पडली. सोनके येथे परिचारक गटाच्या सदस्यांनी भालके आणि काळे गटाच्या दोन सदस्यांना मतदान करण्यास मनाई करण्याची मागणी केली; परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती मागणी फेटाळून लावल्यावर निवड प्रक्रिया झाली. अजनसोंड येथे सरपंच, उपसरपंच प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने झाली नसल्याचा आरोप गावातील एका आघाडीने केला आहे. सरपंच आणि उपसरपंच पदासाठीच्या चिठ्ठ्या एकाच बॉक्‍समध्ये टाकल्या. तो बॉक्‍स पारदर्शी नव्हता आणि संपूर्ण चिठ्ठ्या बाहेर न काढताच एक एक चिठ्ठी बाहेर काढून अर्धवट उघडून नीटपणे न दाखवता विरोधी आघाडीच्या रूपाली घाडगे पाटील या सरपंच झाल्याचे जाहीर करण्यात आले, अशा आशयाची तक्रार तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 

बीएस्सी ऍग्री झालेल्या ज्योती बाबर सरपंच 
गादेगावच्या सरपंचपदी ज्योती बाबर तर उपसरपंचपदी योगेश दत्तात्रय बागल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे, सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असताना देखील गावकऱ्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील बीएस्सी ऍग्री शिक्षण घेतलेल्या ज्योती बाबर यांना सरपंचपदाची संधी दिल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे. गादेगावच्या सरपंच पदासाठी 27 जानेवारी रोजी काढलेल्या आरक्षण सोडतीवेळी सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले होते. त्यामुळे या प्रवर्गातील ज्योती बाबर या निवडून आलेल्या एकमेव सदस्या असल्याने त्यांची निवड निश्‍चित समजून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता. परंतु त्यानंतर नव्याने झालेल्या आरक्षण सोडतीत सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले. ज्योती बाबर यांनी नाराज न होता बदलाचे देखील स्वागत केले होते. परंतु तरीही गावकऱ्यांनी अनुसूचित जातीच्या उच्चशिक्षित असलेल्या ज्योती बाबर यांनाच सरपंचपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरपंचपदासाठी त्यांचा आणि उपरसरपंचपदासाठी योगेश बागल यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल