झोन समित्या सभापतींची एप्रिलनंतरच निवड ! प्रशासनाने उपस्थित केला तांत्रिक मुद्दा 

तात्या लांडगे
Sunday, 3 January 2021

...तर दोन महिन्यांसाठीच सभापती 
झोन समित्यांच्या सभापतींचा कालावधी एक वर्षाचा असतो. 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंतच त्यांचा कार्यकाल असल्याने दरवर्षी झोन समित्यांच्या सभापतींच्या नव्याने निवडी होतात. आता नऊ झोनचा प्रस्ताव शासनाने विखंडीत केल्यानंतर शहरातील आठ झोन समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. मात्र, त्यांच्यासाठी प्रत्येक झोनमध्ये बैठक व्यवस्था, निवडणुकीचा प्रशासकीय खर्च व वेळ घालवून केवळ दोन महिन्यांसाठीच झोन समित्यांच्या सभापतींची निवड सध्याच्या काळात प्रशासनाला परवडणारे नाही. त्यामुळे सर्व झोन समित्यांच्या सभापतींची निवड एप्रिलमध्येच होतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर आयुक्‍त पी. शिवशंकर म्हणाले, झोन समित्यांच्या सभापतींच्या निवडी होणार आहेत. मात्र, आता कार्यवाही कुठपर्यंत आली आहे, याची माहिती नाही. 

सोलापूर : महापालिकेत सभागृहाने आठऐवजी नऊ झोन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावरुन विखंडीत करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता शहरातील आठ झोनच्या सभापतींची निवड होणे क्रमप्राप्त आहे. दरवर्षी सभापतींची निवड अपेक्षित असतानाही मागील चार वर्षांत या सभापतींची निवडच झालेली नाही. आता सभापतींची निवड अपेक्षित आहे, परंतु त्यांचा कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत असल्याने प्रशासनासमोर खर्चाचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे झोन समित्यांच्या सभापती निवडी मार्चनंतरच घेण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरु आहे.

...तर दोन महिन्यांसाठीच सभापती 
झोन समित्यांच्या सभापतींचा कालावधी एक वर्षाचा असतो. 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंतच त्यांचा कार्यकाल असल्याने दरवर्षी झोन समित्यांच्या सभापतींच्या नव्याने निवडी होतात. आता नऊ झोनचा प्रस्ताव शासनाने विखंडीत केल्यानंतर शहरातील आठ झोन समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. मात्र, त्यांच्यासाठी प्रत्येक झोनमध्ये बैठक व्यवस्था, निवडणुकीचा प्रशासकीय खर्च व वेळ घालवून केवळ दोन महिन्यांसाठीच झोन समित्यांच्या सभापतींची निवड सध्याच्या काळात प्रशासनाला परवडणारे नाही. त्यामुळे सर्व झोन समित्यांच्या सभापतींची निवड एप्रिलमध्येच होतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर आयुक्‍त पी. शिवशंकर म्हणाले, झोन समित्यांच्या सभापतींच्या निवडी होणार आहेत. मात्र, आता कार्यवाही कुठपर्यंत आली आहे, याची माहिती नाही. 

महापालिकेतील सात विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध करण्याचे नियोजन महाविकास आघाडीने पदवीधर व शिक्षक आमदारकीनंतर बदलले. त्यानंतर कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी एमआयएम, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन भाजपचा पराभव करण्याचे ठरविले. मात्र, भाजपने सुरवातीपासूनच 'एकला चलो रे' ची भूमिका घेतली. सत्ताधारी भाजपचा पराभव करुन सर्वच विषय समित्या आपल्याला मिळतील, असा ठाम विश्‍वास महाविकास आघाडीने विशेषत: कॉंग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्‍त केला. मात्र, भाजपने शिवसेनेसह एमआयएमच्या नाराज नगरसेवकांची साथ घेतली आणि सातपैकी चार समित्यांवर विजय मिळविला. आता झोन समित्यांवर भाजपने डोळा ठेवला असून या निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट पुन्हा दिसेल का, याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, विषय समित्या निवडीत लक्ष घालून सर्व समित्या महाविकास आघाडीला मिळाव्यात म्हणून आमदार संजय शिंदे यांनी प्रयत्न केले. मात्र, ते प्रयत्न फसल्याने आणि ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वर यात्रेच्या विषयांवरुन शहरात लक्ष घातलेल्या संजय शिंदे यांना कॉंग्रेसकडून विरोध झाला. या पार्श्‍वभूमीवर आता संजय शिंदे झोन समित्या निवडीत लक्ष घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पक्षनिहाय संख्याबळ 

  • भाजप : 49 
  • शिवसेना : 21 
  • कॉंग्रेस : 14 
  • एमआयएम : 9 
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस : 4 
  • वंचित आघाडी : 3 
  • माकप : 1 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of solapur city zone committee chairpersons only after April! The administration presented a technical issue