लॉकडाउन पथ्यावर ! लाईट फिटिंगची कामे करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराने बनवली इलेक्‍ट्रिक मोटारसायकल 

शांतिलाल काशीद 
Tuesday, 15 September 2020

सुरेश पैकेकर हा गौडगाव येथे लाईट फिटिंगचा व्यवसाय करीत आहे. लाईट फिटिंगची कामे करीत असताना आपणही स्वतःमधील टॅलेंटचा शोध घेत इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केलं पाहिजे, हा मनाशी दृढनिश्‍चय केला. सुरेशने पुढे सातत्याने प्रयत्न सुरू ठेवत स्वतःच्या स्प्लेंडर गाडीला इलेक्‍ट्रिक गाडी बनवत ग्रामीण भागातही टॅलेंटला कमी नाही, हे दाखवून दिलं आहे. 

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील गौडगाव येथील सुरेश जालिंदर पैकेकर (वय 28) या युवकाने इलेक्‍ट्रिक मोटारसायकलचा प्रयोग यशस्वी केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाउन काळात करीत असलेल्या त्याच्या अथक परिश्रमाला यश मिळाले. 

सुरेश पैकेकर याने गौडगाव येथील कर्मवीर लोहकरे (गुरुजी) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. सध्या तो गौडगाव येथे लाईट फिटिंगचा व्यवसाय करीत आहे. लाईट फिटिंगची कामे करीत असताना आपणही स्वतःमधील टॅलेंटचा शोध घेत इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केलं पाहिजे, हा मनाशी दृढनिश्‍चय केला. सुरेशने पुढे सातत्याने प्रयत्न सुरू ठेवत स्वतःच्या स्प्लेंडर गाडीला इलेक्‍ट्रिक गाडी बनवत ग्रामीण भागातही टॅलेंटला कमी नाही, हे दाखवून दिले आहे. 

इलेक्‍ट्रिक गाडी बनवत असताना चार वेळा त्याला अपयश आले; मात्र तो खचला नाही. पुन्हा नव्या उमेदीने कामात सातत्य ठेवत दहा दिवसांत इलेक्‍ट्रिक गाडी बनवून एक यशस्वी प्रयोग त्याने करून दाखवला आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरेशने इलेक्‍ट्रिक गाडीचा प्रयोग यशस्वी केल्यामुळे वडील सुरेश पैकेकर व आई कमल पैकेकर यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले. 

तीन तास चार्जिंग केल्यानंतर ही गाडी धावते 100 ते 110 किलोमीटर
त्याने बनवलेल्या इलेक्‍ट्रिक गाडीस तीन तास चार्जिंग केल्यानंतर ही गाडी 100 ते 110 किलोमीटर धावते. इलेक्‍ट्रिक गाडीमुळे सततचे वाढणारे पेट्रोलचे दर पाहता पैशाची बचत होणार आहे व वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण कमी होऊन पर्यावरण संरक्षणास मदत होणार आहे. इलेक्‍ट्रिक गाडी बनवण्यासाठी त्याला 30 हजार रुपयांचा खर्च आला आहे.

अशी बनवली इलेक्‍ट्रिक मोटारसायकल 

  • स्प्लेंडर दुचाकीचे इंजिन काढून बसवले 48 व्होल्टची मोटार, ज्यामुळे ऍव्हरेज वाढले 
  • 12 व्होल्ट, 43 ऍम्पिअरच्या बॅटऱ्या लावल्या 
  • तीन ते चार तासांत चार्जिंग पूर्ण; एक ते दीड युनिट वीज लागते 
  • एका चार्जिंगमध्ये 100 ते 110 किलोमीटर ऍव्हरेज 
  • वेग ताशी 40 ते 45 किलोमीटर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electric motorcycle made by the son of a farmer who does light fitting work