अबब..! हैद्रा येथील जुगार अड्ड्यावरील छाप्यात 11.38 लाखांचा मुद्देमाल जप्त 

चेतन जाधव 
Sunday, 13 September 2020

विशेष पथक व पोलिसांनी हैद्रा येथील गुरप्पा हाचदड यांच्या शेतातील खुल्या जागेमध्ये 16 संशयित आरोपी गोल रिंगण करून मन्ना नावाचा जुगार शुक्रवारी रात्री 11.30 वाजता खेळत होते. या वेळेस पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकूण 11 लाख 38 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : हैद्रा (ता. अक्कलकोट) येथील शेतामध्ये खुल्या जागेत रिंगण करून मन्ना नावाचा जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात दोन मोटारसायकली, एक कार व रोख रक्कम 78 हजार 40 असा एकूण 11 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनेची फिर्याद सोलापूर ग्रामीणच्या विशेष पथकातील पोलिस शिपाई मनोज सुरेश राठोड (वय 25) यांनी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात दिली आहे. या धाडीमध्ये संशयित आरोपी सैपन खतालशा मकानदार (वय 40, रा. हैद्रा), नागराज पिरप्पा टेंगळे (वय 32 रा. माशाळ, कर्नाटक) आदींसह 16 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूर ग्रामीणच्या विशेष पथकास मिळालेल्या माहितीवरून व अक्कलकोट दक्षिण पोलिसांच्या सहकार्याने जुगार अड्ड्यावर टाकण्यात आला. 

विशेष पथक व पोलिसांनी हैद्रा येथील गुरप्पा हाचदड यांच्या शेतातील खुल्या जागेमध्ये 16 संशयित आरोपी गोल रिंगण करून मन्ना नावाचा जुगार शुक्रवारी रात्री 11.30 वाजता खेळत होते. या वेळेस पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मोटारसायकल क्रमांक एमएच 13 सीई 2045, एमएच 13 के एएम 9913, एमएच 42 व्ही 601 या तीन मोटारसायकली, एक एमएच 02 बीएम 5010 ही कार, जुगार साहित्य व रोख रक्कम रुपये 78 हजार 40 असा एकूण 11 लाख 38 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोलापूर ग्रामीणच्या विशेष पथकात पोलिस निरीक्षक विनय बहीर, मनोज राठोड आदींचा समावेश होता. अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात संशयित 16 आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार लाला पवार करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven lakh items seized in a raid on a gambling den in Hydra village