
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थींना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधून दिले जाते. त्यासाठी प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या मंजूर यादीतील पात्र लाभार्थींनाही दुसऱ्या टप्प्यातील निधी मिळालेला नाही.
सोलापूर : महानगरपालिका क्षेत्रातील रमाई आवास योजनेअंतर्गत नव्याने पात्र झालेल्यांची यादी मंजूर करावी आणि त्यांना तत्काळ निधी द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते तथा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी समाजकल्याण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थींना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधून दिले जाते. त्यासाठी प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या मंजूर यादीतील पात्र लाभार्थींनाही दुसऱ्या टप्प्यातील निधी मिळालेला नाही. दुसरीकडे, साडेतीन ते चार हजार लाभार्थींमधील अंदाजे अडीच हजार लाभार्थी रमाई आवास योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्या पात्र लाभार्थींना घरकुलासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर बांधता येईल, असेही चंदनशिवे यांनी या वेळी समाजकल्याण आयुक्तांना सांगितले.
योजनेतील संपूर्ण पात्र लाभार्थींची यादी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडून मागवून घ्यावी, त्यातील पात्र लाभार्थींना लवकरात लवकर मंजुरी द्यावी आणि त्यांना निधीही द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. समाजकल्याण विभागाचे उपायुक्त रवींद्र कदम- पाटील यांनी लवकरच लाभार्थींची यादी मंजूर करून निधी मिळेल, असे सांगितल्याचे चंदनशिवे म्हणाले.
याप्रसंगी मंडई व उद्यान समितीचे सभापती गणेश पुजारी, वंचित बहुजन आघाडीचे तुकाराम डावरे, भीमा मस्के आदी उपस्थित होते.
रमाई आवास योजनेसाठी पाठपुरावा
शहरातील अनेक गोरगरिबांना राहायला हक्काचे घरदेखील नाही. त्यांच्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक आवास योजना असतानाही लाभार्थींना घरे मिळालेली नाहीत. महापालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवूनही समाजकल्याण आयुक्त कार्यालयात ते पडून आहेत. तर दुसरीकडे महापालिका प्रशासन आवास योजनेबाबत गंभीर नसल्याचेही चित्र आहे. या पार्श्वभूमीवर रमाई आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, असे आनंद चंदनशिवे यांनी स्पष्ट केले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
महाराष्ट्र