
सोलापूर : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील पीडितेवर अत्याचार झाल्यानंतर तिच्या मृत्यूचे पडसाद देशभरासह सोलापुरात देखील तीव्रतेने उमटले आहेत. स्त्री अत्याचाराच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी शहरातील डफरिन चौकात लावलेले "हाथरस... मनीषा... आपण काय केले तिच्यासाठी?' हे भावनिक व माणसातील माणुसकी जागा करणारे पोस्टर्स प्रत्येकाला समाजदुःखाची साद घालत आहेत.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका तरुणीवर अत्याचार करून तिला जखमी केले होते. त्यानंतर "त्या' संशयितांनी तिची जीभ कापून टाकली होती. अत्याचाराची एवढी भीषण घटना घडल्यानंतर देखील या अत्याचाराच्या तपासाबाबत सातत्याने अनेक प्रकार समोर आले. या पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृतदेहावर पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्याच्या प्रकारामुळेही जनजीवन संतप्त बनले होते. महिला अत्याचाराच्या इतिहासात ही घटना समाजमन हादरवणारी ठरली आहे.
या सर्व घडामोडींबद्दल सोलापूर शहरात विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी या अमानवीय घटनेचा निषेध केला. त्यानंतर महिला कॉंग्रेस, वंचित बहुजन विकास आघाडी, बहुजन विकास आघाडी, भीमशक्ती यांसारख्या अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जिल्हा प्रशासनाकडे या घटनेबाबत त्यांच्या तीव्र भावना मांडल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या घटनेतील पुरावे नष्ट करणाऱ्या पोलिसांना सहआरोपी करावे अशा मागण्या करण्यात आल्या. खरे तर निर्भया हत्याकांडाप्रमाणे घडलेल्या या घटनेचे पडसाद उमटले असले तरी कोरोना संकटामुळे महिलांची आंदोलने झाली नाहीत.
या सर्व घटनांचा परिणाम लोकापर्यंत पोचवण्यासाठी डफरिन चौकात लावलेले पोस्टर्स अत्यंत वेगळे ठरले आहेत. निषेधाच्या काळ्या रंगामध्ये असलेल्या या पोस्टर्सवर "हाथरस, मनीषा' एवढे शब्द लिहून "आपण काय केले तिच्यासाठी?' असा प्रश्न मांडला गेला आहे. कोणत्याही संवेदनशील माणसाच्या भावनांना हात घालण्यासाठी तयार केलेले हे आगळे पोस्टर्स सोलापूर शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे, या पोस्टर्सवर कुठल्या संघटनांची, राजकीय पक्षांची किंवा नेत्यांची नावे नाहीत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.