तुमची नोकरी गेली आहे का? "अटल कल्याण'मधून मिळवा तीन महिन्यांचा 50 टक्‍के पगार !

तात्या लांडगे 
Thursday, 31 December 2020

कोरोना आपत्तीमुळे जॉब गेलेल्या नोंदणीकृत उद्योगांमधील कामगारांना राज्य कामगार विमा योजनेद्वारे आधार देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. त्यात ऍटोमोबाईल, आयटीसह अन्य उद्योगांमधील कामगारांचा समावेश आहे. 

सोलापूर : कोरोनाचे संकट थोपवून लावण्याच्या हेतूने केंद्र सरकारने 23 मार्चपासून देशभर लॉकडाउन केला. या काळात अनेकांना कामावरून घरी बसावे लागले. 23 मार्च ते 31 डिसेंबर या काळात नोकरी गेलेल्या संघटित उद्योगातील कामगारांसाठी राज्य कामगार विमा आयुक्‍तालयातर्फे अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजनेअंतर्गत पगारातील 50 टक्‍के रक्‍कम (तीन महिन्यांपर्यंत) दिली जात आहे. राज्यभरातून या योजनेअंतर्गत तब्बल 11 हजारांहून अधिक नोकरदारांनी अर्ज केले असून, त्यात पुणे विभाग अव्वल आहे. 

कोरोना आपत्तीमुळे जॉब गेलेल्या नोंदणीकृत उद्योगांमधील कामगारांना राज्य कामगार विमा योजनेद्वारे आधार देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. त्यात ऍटोमोबाईल, आयटीसह अन्य उद्योगांमधील कामगारांचा समावेश आहे. राज्य कामगार विमा आयुक्‍तालयाच्या पुणे, नाशिक, मरोळ, औरंगाबाद, नागपूर, मुंबई या सहा विभागाअंतर्गत आतापर्यंत 13 हजारांहून अधिक कामगारांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यात मुंबईतून सहाशेवर तर पुण्यातून दीड हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. आतापर्यंत दीड हजाराहून अधिक कामगारांना तीन कोटींपर्यंत रक्‍कम वितरीत करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र व राज्य सरकारकडून कामगारांना मिळणाऱ्या योजनांसाठी उद्योगांमधील कामगारांची संख्या किमान 20 पर्यंत असणे बंधनकारक होते. मात्र, लॉकडाउननंतर अनेकांचा रोजगार गेल्याने राज्य सरकारच्या पुढाकारातून कामगारांची उद्योगांमधील मर्यादा आता दहा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता असे कामगारही विविध योजनांसाठी पात्र ठरणार आहेत. 

मार्च ते डिसेंबर 2020 या काळातील कामगारांसाठी योजना 
कोरोना काळात ज्या कामगारांचा रोजगार गेला आहे, त्यांच्यासाठी अटल बिमित योजना लागू आहे. संबंधित कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा. पुणे विभागातील 334 कामगारांना आतापर्यंत 41 लाख 58 हजार रुपये वितरीत केले आहेत. अर्जदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांची छाननी करून पात्र लाभार्थींना लाभ दिला जात आहे. 
- चंद्रशेखर पाटील, 
संचालक, कामगार राज्य विमा महामंडळ, पुणे 

योजनेसंदर्भातील ठळक बाबी... 

  • 23 मार्च ते 31 डिसेंबर या काळात कोरोनामुळे जॉब गमावलेले कामगार योजनेसाठी पात्र 
  • लाभासाठी संबंधित कामगार त्या कंपनीत दोन वर्षांपर्यंत काम करत असावा; आता तो कामावर नसावा 
  • कामावरून कमी करण्यापूर्वीच्या सहा महिन्यांत संबंधित कामगाराने 78 दिवस काम केलेले असायला हवे 
  • कामावरून कमी करण्यापूर्वीचे सहा महिने वगळता उर्वरित दीड वर्षात त्याने 78 दिवस काम केलेले असावे 
  • कोरोनामुळे जॉब गमावलेल्यांना अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 31 मार्चपर्यंत मुदत 

लाभार्थ्यांनो, असा भरा अर्ज... 
"ईएसआय'साठी नोंदणीकृत ज्या कामगारांचा कोरोनामुळे जॉब गेला आहे, त्यांच्यासाठीच ही योजना लागू आहे. त्यांनी एम्प्लॉईज नंबर टाकून लॉग इन करावे. त्यानंतर अटल बिमित म्हणून पर्याय आहे, त्यावर क्‍लिक करून बॅंक डिटेल्ससह अन्य माहिती भरून तो अर्ज सबमिट करावा. त्यानंतर त्या अर्जाची पडताळणी होऊन पात्र लाभार्थींना तीन महिन्यांचा 50 टक्‍के पगार काही दिवसांतच त्यांच्या बॅंक खात्यात जमा केला जातो. 
- शशिशेखर शिराळे, 
व्यवस्थापक, राज्य कर्मचारी विमा निगम, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employees who have lost their jobs due to lockdown will get three months half salary from Atal Kalyan Yojana