सोलापुरातील दहा कंपन्यांतील 1519 जागांसाठी रोजगार मेळावा 6 जुलैपासून ऑनलाइन रोजगार मेळावा 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 2 जुलै 2020

या ठिकाणी साधावा लागेल संपर्क 
इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. या रोजगार मेळाव्यात जास्त जास्त पात्र व इच्छुक व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0217-2622113 या दूरध्वनीवर किंवा solapurrojgar1@gmail.com या मेलवर संपर्क साधावा लागणार आहे. 

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन, संचारबंदी/जमावबंदी असे प्रतिबंधात्मक उपाय केले. या उपाययोजनांमुळे कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात रोखता आला परंतु अर्थकारणाला मोठी खीळ बसल्याने अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा बिकट स्थितीत सोलापूरच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने बेरोजगारांसाठी गुड न्यूज आणली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील दहा औद्योगिक कंपन्यांतील 1 हजार 519 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याकरिता 6, 7 आणि 8 जुलै रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित केल्याची माहिती सोलापूरच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी दिली. लॉकडाऊनमुळे बंद झालेले उद्योग अटी व शर्तीवर सुरू झाले आहेत. अशा उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण, बारावी, डिप्लोमा, पदवीधर, पदवीव्युत्तर पदवी झालेल्या उमेदवारांसाठी ही भरती उपयुक्त आहे. या मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर, फिटर, इलेक्‍ट्रिशियन, मिल अटेंडर, शिफ्ट असिस्टंट, कार्पेंटर, ड्राफ्ट्‌समन, सेल्स एक्‍झिक्‍युटिव्ह, सर्व्हिस इंजिनिअर, टेली कॉलर, संगणक ऑपरेटर, विमा सल्लागार, नर्सिंग फार्मासिस्ट, ड्यूटी मेडिकल ऑफिसर, सिक्‍युरिटी गार्ड, सुपरवायझर, स्विपर, आया या पदांची भरती होणार आहे. उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा फोनद्वारे ऑनलाइन घेण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment fair for 1519 posts in ten companies in Solapur. Online job fair from 6th July