
आळजापूर (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत संजय शिंदे गटाचे सरपंच प्रतिनिधी युवराज गपाट यांनी कोट्यवधी रुपयांची कामे करूनही त्यांना बहुमत मिळवता आले नाही. तर गपाट यांनी केलेली विकासकामे ही ठेकेदारांना उपयुक्त केल्याचा आरोप विरोधकांनी केल्याने गपाट व त्यांच्या पत्नी वनिता गपाट यांचा पराभव झाला.
पोथरे (सोलापूर) : आळजापूर (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत संजय शिंदे गटाचे सरपंच प्रतिनिधी युवराज गपाट यांनी कोट्यवधी रुपयांची कामे करूनही त्यांना बहुमत मिळवता आले नाही. तर गपाट यांनी केलेली विकासकामे ही ठेकेदारांना उपयुक्त केल्याचा आरोप विरोधकांनी केल्याने गपाट व त्यांच्या पत्नी वनिता गपाट यांचा पराभव झाला. कोट्यवधी रुपयांची विकासकामे करूनही युवराज गपाट यांची सत्ता खंडित झाली आहे.
आळजापूर येथे "आदिनाथ'चे संचालक डॉ. हरिदास केवारे व सरपंच प्रतिनिधी युवराज गपाट यांच्या नेतृत्वाखाली जय हनुमान ग्रामविकास पॅनेल तर माजी सरपंच बिभीषण खरात यांच्या नेतृत्वाखाली शिवमल्हार परिवर्तन पॅनेलने निवडणूक लढवली. आळजापूर ग्रामपंचायतीवर गेल्या पाच वर्षांपासून सिंधूबाई गोरख गपाट या सरपंच असून त्यांचे कामकाज त्यांचा मुलगा युवराज गपाट यांनी पाहिले आहे. गेल्या पाच वर्षात गपाट यांनी आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. मात्र विरोधकांनी, ही कामे निकृष्ट दर्जाची केली असून ठेकेदारास उपयुक्त कामे केल्याबाबत मोठ्या तक्रारी केल्या आहेत. याशिवाय नदीकाठचे गाव असूनही गावाला पिण्यासाठी पाणी नाही, आराखड्यानुसार कामे केली नाहीत, अशा प्रमुख मुद्द्यांवर बिभीषण खरात यांनी ही निवडणूक लढवून नऊपैकी पाच जागांवर यश संपादन करून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर युवराज गपाट यांच्या पत्नी वनिता गपाट यांना 45 मताने पराभूत व्हावे लागले आहे.
आई व मुलाचा विजय
अभियंता अशोक संजय रोडे यांनी गावात केलेल्या स्वखर्चातून लाखो रुपये कामांची दखल ग्रामस्थांनी घेतल्याने स्वतः संजय रोडे व त्यांची आई पार्वती रोडे हे दोघेही विजयी झाले आहेत. एकाच वेळी आई व मुलगा निवडून आल्याने आळजापूरसह परिसरात याची चर्चा होत आहे.
विकासकामांना लोकांची साथ
विरोधात असूनही गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही तत्पर राहिल्याने ग्रामस्थांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिले आहे. यापुढेही गावातील नागरिकांच्या समस्या सोडवून गावाचा सर्वांगीण विकास करणार आहोत, असे आश्वासन पॅनेल प्रमुख व माजी सरपंच बिभीषण खरात यांनी दिले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल