फटाक्‍याचे प्रदूषण टाळून दिवाळीचा आनंद घ्या : मोहोळमधील मान्यवरांचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

फटाक्‍याच्या होणाऱ्या प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका शेकडो पटीने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे फटाक्‍यांमधील अल्युमिनियम, सल्फाइड , नायट्रेट, तांबे, लिथियम, यासारखे घातक रासायनिक पदार्थामुळे मानवाच्या फुप्फुसावर दुष्परिणाम होतो

 

मोहोळ : सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून यामुळे कोरोनाच्या रुग्णाला त्रास होऊ नये यामुळे आपण दिवाळीमध्ये फटाके उडवू नयेत त्या ऐवजी घरापुढे रांगोळी काढावी, अभ्यंगस्नान करावे, नवीन कपडे घालावेत, रोज ताजे पदार्थ करून आप्त व मित्रांना विविध माध्यमांच्या सहाय्याने समन्वय ठेवून यंदाची दिवाळी गोड-गोड व उत्साहात साजरी करावी फटाके उडवून प्रदूषण करू नये, असे आवाहन मोहोळ येथील काही नागरिकांनी केले आहे. 

मोहोळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते व जागरुक पत्रकारांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात दिवाळी सण उत्साहात साजरा केला जातो यामध्ये आकर्षण म्हणजे फटाके उडवणे परंतु यंदाची दिवाळी सर्वार्थाने वेगळी आहे कोरोना काळातील ही दिवाळी उत्साहा बरोबर तितक्‍याच गांभीर्याने साजरी करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे आत्तापर्यंत शहरात तीनशे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 43 जणांवर उपचार सुरू आहेत आत्ता पर्यंत 236 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर शहरातील आपल्या जवळचे असणारे मित्र,कोणाचे शेजारी ,कुणाचे नातेवाईक असे एकवीस जण कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाले आहेत. आता सध्या रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे मात्र फटाक्‍याच्या प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त करत नागरिकांना फटाके उडवू नये, असे आवाहन केले आहे. 

फटाक्‍याच्या होणाऱ्या प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका शेकडो पटीने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे फटाक्‍यांमधील अल्युमिनियम, सल्फाइड , नायट्रेट, तांबे, लिथियम, यासारखे घातक रासायनिक पदार्थामुळे मानवाच्या फुप्फुसावर दुष्परिणाम होतो आणि कोरोनाचा आघातदेखील फुप्फुसावरच होतो. कोरोनाचा प्रादुर्भाव थंडीच्या दिवसात सर्दी खोकल्याचे आजार वाढून कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे फटाके उडवण्याऐवजी घरासमोर रांगोळ्या घालून, नवीन कपडे घालून, फराळाचे ताजे पदार्थ करून, आप्त व नातलगांच्या विविध समाजमाध्यमातून भेटी घेऊन, कोरोनाविषयी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार दिवाळी उत्साहात साजरी करण्याचे आवाहन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार फाटे, प्रा. श्रीधर उन्हाळे, प्रा. सुधीर गायकवाड, रामचंद्र खांडेकर, डॉ. शैलेश झाडबुके, ऍड, गोविंद पाटील, आनंद गावडे, रमेश आदलिंगे, मदन कुलकर्णी, सुधाकर काशीद, बाबासाहेब सुतकर, अनिल कोरे, विजयकुमार चांदणे, धर्मराज चवरे, शीलवंत क्षिरसागर, सुहास घोडके या वेगवेगळया क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enjoy Diwali by avoiding the pollution of firecrackers: Appeal of dignitaries in Mohol