चांदी की सायकल सोने की सीट... वकिलाची वधूसह मांडवात चक्क सायकलवरून एंट्री ! 

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 9 January 2021

लग्न समारंभात नव वधू-वरांचा भव्य वरातीने, ढोल-ताशा व बॅंड-बाजासह जल्लोषात मिरवणूक काढली जाते. त्यांचे मांडवात आगमनही भव्य-दिव्य स्वरूपात होते. मात्र सोलापुरात एका विवाह समारंभात अनोखा प्रसंग पाहायला मिळाला, तो पाहून वऱ्हाडी मंडळी अचंबितच झाले.

सोलापूर : लग्न समारंभात नव वधू-वरांचा भव्य वरातीने, ढोल-ताशा व बॅंड-बाजासह जल्लोषात मिरवणूक काढली जाते. त्यांचे मांडवात आगमनही भव्य-दिव्य स्वरूपात होते. मात्र सोलापुरात एका विवाह समारंभात अनोखा प्रसंग पाहायला मिळाला, तो पाहून वऱ्हाडी मंडळी अचंबितच झाले. येथील सोलापूर सायकलिस्ट फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ऍड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी स्वतःच्या विवाह सोहळ्यात नववधूला सायकलवर बसवून डबलसीट मांडवात प्रवेश केला. हे पाहून वऱ्हाडी मंडळी अचंबित झाले. मात्र, यावरून ऍड. कक्कळमेली यांनी उपस्थित पाहुण्यांना पर्यावरणपूरक सायकलिंगचे महत्त्व सांगणारा संदेश दिला. 

लग्न समारंभात नवदाम्पत्याचे अनोख्या पद्धतीने स्वागत करणे हे आजकाल आपण पाहतो. पण त्याहूनही असा वेगळ्या स्वरूपात लग्न मंडपात नव वधू - वर सायकलवरून डबलसीट एन्ट्रीचा प्रसंग एका विवाह सोहळ्यात पाहण्यास मिळाला. हा प्रसंग सोलापुरातील ऍड. मंजुनाथ कक्कळमेली यांच्या विवाह सोहळ्यात पाहता आला. 

सोलापूर सायकलिस्ट फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार असलेले ऍड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी नववधू सोबत विवाह मंडपात चक्क सायकलवर स्वार होऊन प्रवेश केला. स्वतःच्या लग्नात त्यांनी अशा प्रकारे एन्ट्री केल्याने सर्व पाहुणे मंडळींची वाढलेली उत्सुकता संपली आणि त्यांना आश्‍चर्याचा सुखद धक्काही बसला. 

या वेळी सायकलिस्ट फाउंडेशन, सोलापूर व स्मार्ट रोड सेफ्टी फाउंडेशनतर्फे नवीन जोडप्यांना आठ देशी झाडे भेट देण्यात आली. या वेळी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सारंग तारे, सचिव भाऊराव भोसले, गणेश शिलेदार, भारतीय नौदल अधिकारी विश्वनाथ गायकवाड, संदीप पाटील, रजनीकांत जाधव, चेतनकुमार लिगाडे उपस्थित होते. 

व्यायामासाठी सायकल उपयुक्‍त 
शक्‍य असल्यास वाहनांचा वापर टाळावा. सायकलचा उपयोग करून पर्यावरणाचीही जपणूक करता येईल. तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मानसिक तसेच शारीरिक संतुलन राहावे, यासाठी सायकलिंगसारखा दुसरा व्यायाम नाही. त्यामुळे सर्वांना सायकलिंगचे महत्त्व कळावे व स्वास्थ्य चांगले राहावे, हा संदेश यातून देण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entry at the wedding venue by bicycle with the wife to be done by the lawyer