
माढा (सोलापूर) : हिवाळ्याच्या हर्षदायी वातावरणात अनेक पाहुणे विविध देश पार करून भारतात येतात व ते पाहुणे म्हणजे स्थलांतरित पक्षी. त्यापैकीच एक असलेले रोझी स्टर्लिंग, ज्याला मराठीत भोरड्या किंवा पळसमैना - गुलाबी मैना म्हणतात. या पक्ष्यांचे माढ्यात आगमन झाले आहे.
या पक्ष्यांच्या एका समूहाने सध्या माढ्यात सोलापूर रस्त्यालगतच्या बोरीच्या बागांनजीक व सूतगिरणी परिसरात आपला तळ पसरवला असल्याने पर्यावरणीय व पक्षी शास्त्रीयदृष्ट्या ही बाब माढ्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व वाढविणारी ठरत आहे. माढ्यात आलेल्या या रोझी स्टर्लिंगची वीण मे ते जुलैपर्यंत लगतच्या देशांत होते व वीण होताच हा पक्षी समूह हजारोंच्या संख्येने भारतात येतो. पश्चिमी जगतातून व मध्य आशियातून रोमानिया, युक्रेन, कझाकिस्तान, तुर्किस्तान, ग्रीस, उजबेकिस्तान, इराण, अफगाणिस्तान, मंगोलिया, पाकिस्तान, चीन, नेपाळ या मार्गे हजारो मैल अंतर कापून ते भारतात येतात.
अत्यंत सुंदर दिसणाऱ्या या पक्ष्याचे डोके व मान काळीभोर असते. गळा व पोट चमकदार गुलाबी असून पाठीवर पांढरी-गुलाबी झालर असते व डोक्यावर मध्यभागी आकर्षक तुरा, चोच तीक्ष्ण असून पंख काळे-तपकिरी, किंचित निळे-हिरवट असतात. नर व मादी सारखेच असून मादीचा तुरा थोडा आखूड असतो. हे पक्षी पिकांवरील अळ्या व कीटकांचे आक्रमकरीत्या भक्षण करत असल्याने यांच्या आगमन काळात कीटकांची संख्या कमी होते. त्यामुळेच यांना "नैसर्गिक कीटकनाशक' म्हणतात तर यांच्या विष्ठेतून जमीन सुपीक होत असल्याने यांना "शेतकरी मित्र' असेही संबोधले गेले असून, यांच्या विष्ठेतून मोठमोठे वृक्ष उगवतात. वनस्पतींची पुनर्निर्मिती होऊन परागकणांची देवाण-घेवाण होते. हे पक्षी फुलांतील मध खातात म्हणून दक्षिण भारतात यांना "मधुसारिका' असे संबोधतात.
यांचे समूहनृत्य विहंगम असते. यंदाच्या प्रचंड पावसामुळे धरणांची पाणीपातळी वाढून त्यांना पोषक असलेली पाणथळ क्षेत्रे उपलब्ध झाली नाहीत म्हणून हे पक्षी धरण परिसराशिवाय इतरत्र आढळून येत आहेत. शिवाय 2017 पासून माढ्यात इन्स्पायर फाउंडेशनकडून एक हजार वृक्षांची लागवड केली आहे. उंच झाडांवर रहिवास करणाऱ्या व फुलांतील कीटक व मध खाणाऱ्या या पक्ष्यांसाठी येथील वातावरण पोषक असल्यानेच त्यांनी माढ्यात तळ ठोकला आहे. यात भर म्हणून यावर्षी इन्स्पायर फाउंडेशनने तेराशेहून अधिक फुलझाडांची लागवड केली आहे.
माढ्यात 25 हून अधिक प्रजाती
फुलझाडांकडे आकर्षित होणाऱ्या रोझी स्टर्लिंग व इतर दुर्मिळ होत चाललेल्या सुमारे तीसहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती माढ्याकडे येत्या दोन-तीन वर्षात प्रभावित होऊन आश्रयाला येतील, अशी माहिती इन्स्पायर फाउंडेशनच्या सदस्यांनी दिली. माढ्यात सध्या 25 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. युरोपीय देशांतून येणारे फ्लेमिंगो माढ्यातील चिंचोली रस्त्याकडील ओढ्याकाठी आढळून आले होते. वैराग रस्ता, सोलापूर रस्ता येथील विजेच्या तारांवर दररोज सकाळी हजारो पक्ष्यांची शाळा भरते. त्यात रोझी स्टर्लिंग या परदेशी पाहुण्यांनी भर घातली असून, निसर्गप्रेमी व पक्षी निरीक्षकांसाठी ही मोठी पर्वणी ठरत आहे.
पर्यावरणाबाबत माढ्यात होत असलेल्या बदलांचा व या भागातील पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल असल्याने परदेशी पक्षी आपल्या भागात येत आहेत. वृक्षारोपणाची चळवळ या भागात अधिक बळकट झाल्यास हे बदल मोठ्या प्रमाणावर दिसतील.
- विजय ठोंबरे,
पर्यावरण अभ्यासक, माढा
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.