हद्दवाढ भाग 29 वर्षांनंतरही तहानलेलाच ! महापालिकेचा टॅंकरवर 14 कोटींचा चुराडा; आयुक्‍तांनी काढले परिपत्रक 

Water Supply
Water Supply
Updated on

सोलापूर : शहरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यासाठी 29 वर्षांत महापालिकेने तब्बल नऊशे ते एक हजार कोटींहून अधिक खर्च करूनही पाणीपुरवठा विस्कळितच आहे. दुसरीकडे पाइपलाइन नसलेल्या सहा प्रभागांना टॅंकरद्वारेच पाणीपुरवठा केला जात असून 1992 पासून महापालिकेने टॅंकरवर तब्बल 13 ते 15 कोटींचा खर्च केला आहे. आता प्रत्येक नगरसेवकाने त्यांच्या भांडवली निधीतील 50 टक्‍के निधी पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी वापरावा, असे परिपत्रक आयुक्‍तांनी काढले आहे. मात्र, नगरसेवक त्यानुसार अंमलबजावणी करतील का? याची उत्सुकता आहे. 

शहरातील नागरिकांना तीन-चार तर कधी पाच-सात दिवसाआड पाणी मिळत आहे. विशेषत: हद्दवाढ भागातील नागरिकांना कधी-कधी सात-आठ दिवसाआड पाणी मिळत आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने इलेक्‍ट्रिक मोटारी लावून पाणी उपसा करावा लागत आहे. हद्दवाढ भाग शहरात समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली. हद्दवाढ भागात एक लाख 30 हजार 50 मिळकती असून त्यातून दरवर्षी सुमारे 102 कोटींचा महसूल मिळतो. मात्र, नागरिकांना पुरेशा पायाभूत सुविधा मिळाल्याच नाहीत. "यूआयएसएसएमटी' यासह नावीन्यपूर्ण योजना, नगरोत्थान योजना, अमृत, 14 वा वित्त आयोग, स्मार्ट सिटी आणि नगरसेवकांच्या भांडवली निधीतून महापालिकेने आजवर एक हजार कोटींहून अधिक रुपयांचा खर्च नुसत्या पाणी प्रश्‍नावर केला. तरीही पाण्याचा प्रश्‍न कायम असून आता त्यावेळची पाइपलाइन जुनाट झाल्याने नव्या पाइपलाइनची मागणी केली जात आहे. वारंवार कोट्यवधींचा निधी देऊनही प्रश्‍न सुटत नसल्याने आता आयुक्‍तांनी प्रत्येक नगरसेवकाने त्यांच्या भांडवली निधीतील 50 टक्‍के रक्‍कम त्यांच्या भागातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी खर्च करावा, असे परिपत्रक काढले आहे; जेणेकरून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल आणि नागरिकांना नियमित पाणी मिळेल, असा विश्‍वास आहे. 

वजनदार नगरसेवकांच्याच प्रभागात टॅंकर 

  • प्रभाग 11 : कुमुद अंकाराम, राजकुमार हंचाटे, महेश कोठे, अनिता मगर 
  • प्रभाग 12 : शशिकला बत्तुल, विनायक कोंड्याल, देवी झाडबुके, डॉ. अनगिरे 
  • प्रभाग 19 : श्रीनिवास करली, विजयालक्ष्मी पुरुड, अनिता कोंडी, गुरुशांत धुत्तरगावकर 
  • प्रभाग 20 : बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, परवीन इनामदार, अनुराधा काटकर 
  • प्रभाग 25 : वैभव हत्तुरे, सुभाष शेजवाल, मनीषा हुच्चे 
  • प्रभाग 26 : राजश्री चव्हाण, प्रियांका माने, शिवा बाटलीवाला 

एका टाकीतून पाण्याचा सहा किलोमीटर प्रवास 
शहराची लोकसंख्या अंदाजित साडेअकरा लाखांपर्यंत आहे. 1992 आणि आताची शहर व हद्दवाढची परिस्थिती बदलली असून लोकसंख्या वाढली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इमारती उभारल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा करण्यासाठी साधारणपणे दीडशे टाक्‍यांची गरज असतानाही शहरात अवघ्या 52 पाण्याच्या टाक्‍या आहेत. जुनाट पाइपलाइन आणि त्यातच चार-पाच इंची पाइपलाइन असल्याने एका टाकीवरून पाण्याचा प्रवास पाच-सहा किलोमीटरहून अधिक होतो आहे. त्यामुळे पाणी गळती, चोरी वाढल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणीदेखील मिळत नाही. देसाई नगर, आरती नगरात पाइपलाइन टाकावी म्हणून गुरुशांत धुत्तरगावकर यांनी यापूर्वी निदर्शनास आणून देऊनही पुढे काहीच झाले नाही. या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांना सक्‍त सूचना केल्या असून, विस्कळित पाणीपुरवठा असलेल्या ठिकाणाबरोबरच ज्या ठिकाणी पाइपलाइन नाही, अशा ठिकाणासह डबल लाइन कोणकोणत्या ठिकाणी आहे, याची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. 

माजी सभागृहनेत्याचे नगरसेवकांना आव्हान 
महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या प्रयत्नातून शहरातील प्रत्येक नगरसेवकाला 40 लाखांचा तर हद्दवाढ भागातील नगरसेवकांना प्रत्येकी 60 लाखांच्या भांडवली निधीची तरतूद करण्यात आली आहे. आगामी बजेटमध्येही ही तरतूद कायम ठेवली जाईल. शहराच्या पाणीपुरवठ्याकडे आतापर्यंत लक्ष न देता स्वत:च्या प्रभागाचासुद्धा पाणीपुरवठा सुधारू न शकलेले काही नगरसेवक पाणीपुरवठ्याचे भांडवल करून राजकारण करू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी त्यांचा सर्वच भांडवली निधी पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी द्यावा, आम्ही तयार आहोत, कोणाची तयारी आहे हे जाहीर करावे, असे आव्हान दिले आहे. आतापर्यंत धुत्तरगावकर यांनी पै ना पै पाण्यासाठीच दिला आहे. 

हद्दवाढ भागाची स्थिती 

  • हद्दवाढ भाग शहरात समाविष्ट : 1992 
  • एकूण अंदाजित लोकसंख्या : 4.75 लाख 
  • मिळकतींची संख्या : 1,30,050 
  • दरवर्षीचा मिळणारा महसूल : 102 कोटी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com