सुशीलकुमार शिंदे- नरसय्या आडम यांचे `या` बाबत हम साथ.. साथ है.....

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 21 मार्च 2020

सर्वच राजकीय पक्षांनी कामगारांसाठी अन्नधान्याची सोय करावी 
सध्या जगभरामध्ये कोरोनाची साथ पसरली आहे. त्यामुळे कारखाने व खासगी अस्थापना बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. निवडणुकीच्या वेळी कामगारांसाठी अन्नधान्याची सोय करणाऱ्या राजकीय पक्षांनी अशा आपत्कालीन स्थितीतही ही सोय करावी. ज्या कामगारांमुळे आपला उद्योग भरभराटीला येतो, त्यांच्यासाठी आपला खारीचा वाटा उद्योजकांनीही उचलावा, असे आवाहन श्री. आडम यांनी केले. 

सोलापूर : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांचे नातं म्हणजे विळ्या-भोपळ्याचे हे सर्वश्रुत आहे. निवडणुका आल्या की या दोघांमध्ये सुरु झालेली राजकीय आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी लक्षवेधी असते. सोलापुरातील एका घटनेबाबत मात्र या दोघांचे एकमत झाल्याचे आज शनिवारी स्पष्ट झाले. 

गेल्या आठवड्यात सोलापुरात श्री. शिंदे आणि आमदार सुभाष देशमुख यांची ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी सोलापूरच्या विकासासंदर्भात मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या कार्यक्रमाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. मुलाखतीच्या रुपाने सकारात्मक पाऊल पुढे पडल्याचे मत अनेक नेटीझन्सनी व्यक्त केले, त्याचवेळी ही मुलाखत म्हणजे फार्स होता अशा प्रतिक्रियाही काहीजणांनी नोंदविल्या. या मुलाखतीदरम्यान या दोन्ही नेत्यांना श्री. घळसासी यांनी सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणीसंदर्भात प्रश्‍न विचारला. त्यावेळी, चिमणी काढली तरी त्या ठिकाणी मोठे विमाने येणार नाहीत. त्यापेक्षा त्या ठिकाणी लागणारा वेळ आणि पैसा बोरामणी विमानतळासाठी खर्च झालेला बरा, असे उत्तर श्री. शिंदे यांनी दिले होते. तर, कारखाना इतर ठिकाणी हलवा. त्याचा खर्च आणि नुकसानभरपाईच नव्हे तर जागाही मी सरकारकडून मिळवून देईन, असे मी स्वतः धर्मराज काडादी यांना सांगितले होते,असा गौप्यस्फोट श्री. देशमुख यांनी केला होता. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील कामगारांसाठी शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने काय केले पाहिजे या मागणीची माहिती देण्यासाठी श्री. आडम यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये पत्रकारांनी चिमणीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी, ""शिंदेंना सर्वात जास्त विरोध करणारा नेता म्हणून मझी देशात ख्याती आहे. तर श्री. देशमुख यांनी माझ्या रे नगरचा प्रकल्प अडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तथापि बोरामणी विमानतळाबाबत या दोघांनी जी भूमिका विशद केली त्याबाबत मी सहमत आहे'', असे स्पष्ट केले. चिमणी पाडून सोलापुरातील कामगारांच्या पोटावर कशाला पाय देता, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. त्यावेळी, चिमणी पाडल्यावर गाळपावर काही परिणाम होणार नाही. ही चिमणी सहवीज निर्मितीसाठीची आहे, असे पत्रकारांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यावेळी "सध्या हा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे त्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. सगळ्या वाईट घटनांचा नारळ माझ्याच डोक्‍यावर कशाला फोडायला हवे?' असा प्रश्‍न उपस्थित करीत हा विषय थांबवला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex union minister sushilkumar shinde and ex mla narsayya aadam news