मोबाईल हटवा, तरच जाईल थकवा ! कानांवर, डोळ्यांवर व मुलांच्या जिज्ञासू वृत्तीवरही गंभीर दुष्परिणाम 

अनुराग सुतकर 
Friday, 15 January 2021

सतत मोबाईलवर बोलल्याने कानाजवळील भाग गरम होतो आणि त्यामुळेच कान दुखणं, ऐकू कमी येणं या समस्या उद्‌भवतात. आता तर काहींना रात्रभर कानामध्ये हेडफोन लावून गाणी ऐकण्याची सवय असते, त्याशिवाय त्यांना झोपच येत नाही. हेडफोनमधून येणाऱ्या सततच्या कर्कश आवाजामुळे ग्लियोमा, ब्रेन ट्यूमर यांसारखे आजार होतात. 

सोलापूर : तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात माणूस जितका स्वतःचा फायदा बघतोय, तितकाच त्याच्या आहारीही जातोय आणि त्यातच भर म्हणून मोबाईलचा अतिरिक्त वापर करून शरीरावर अपाय करून घेतोय. मोबाईलच्या अतिवापरामुळे कानांवर व डोळ्यांवर दुष्परिणाम होत आहेत. याशिवाय शरीरिक थकवा जावणत आहे. मोबाईलमुळे लहान मुलांमधील जिज्ञासू वृत्ती कमी होत आहे. यासाठी मोबाईलचा अतिवापर कमी करणे गरजेचे आहे. 

दैनंदिन जीवनातला मोबाईल हा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईल हा संपर्काचे व माहिती मिळविण्याचे प्रभावी साधन आहे. संवाद साधणे व माहिती मिळवणे हे जरी मोबाईलचे प्राथमिक व मूळ कार्य असले तरी मोबाईल या दोन गोष्टींसाठी कमी आणि इतर अपायकारक गोष्टींसाठी जास्त वापरला जातोय. यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांसाठीच तो तितकाच अपायकारक आहे. हे सर्वजण मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना बळी पडत आहेत. 

कानांवर होणारे मोबाईलचे दुष्परिणाम 
सध्याची तरुणांमधील वस्तुस्थिती अशी की, एखाद्या वेळचं जेवण चुकलं तरी चालेल पण मोबाईलचा डाटा रिचार्ज संपू नये, म्हणजे झालं. आपण ऐकलेले शब्द मेंदूकडे जातात आणि परत मेंदूने सूचना दिल्या की आपण बोलतो. तसे पाहिले तर या क्रियांचा वेग फार जास्त असतो, परंतु मोबाईलमधून उत्पन्न होणारे इलेक्‍ट्रिक तरंग यामुळे कानाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. पर्यायाने ऐकू कमी येतो. आपण सतत मोबाईलवर बोलल्याने कानाजवळील भाग गरम होतो आणि त्यामुळेच कान दुखणं, ऐकू कमी येणं या समस्या उद्‌भवतात. आता तर काहींना रात्रभर कानामध्ये हेडफोन लावून गाणी ऐकण्याची सवय असते, त्याशिवाय त्यांना झोपच येत नाही. हेडफोनमधून येणाऱ्या सततच्या कर्कश आवाजामुळे ग्लियोमा, ब्रेन ट्यूमर यांसारखे आजार होतात. 

डोळ्यांवर होतात असे परिणाम 
मोबाईल वापराचे जसे दुष्परिणाम कानांवर होत आहेत तसेच दुष्परिणाम हे डोळ्यांना देखील आहेत. आता हल्लीच्या युगात नवीन ट्रेंड वाढत आहे तो वेबसिरीजचा. साधारणतः एक वेबसिरीज पाच ते आठ तास सुरू राहते. वेबसिरीजची रचना कुतूहल वाढवणारी असते. याशिवाय रात्री अंधारात मोबाईलचा वापर करणे अपायकारक आहे. 

मोबाईलच्या अतिवापरामुळे माणूस नव्या तंत्रज्ञानासोबतच नवनवीन व्याधींनाही आमंत्रण देत आहे. मोबाईलमुळे शारीरिक मैदानी खेळ बंद झाले आहेत, त्याचाच परिणाम म्हणून सतत मोबाईल पाहिल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील ताण वाढला आहे. 
- रागिणी कुलकर्णी, 
शिक्षिका, मॉडर्न हायस्कूल 

मोबाईल फार जवळ धरून पाहिल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो, शिवाय आता सर्वच लहान मुलांचे ऑनलाइन शिक्षण प्रणालीवरून शिक्षण चालू आहे, त्यांनी सतत मोबाईलमध्ये पाहात राहु नये. मोबाईलमध्ये विशिष्ट अंतर ठेवून पाहावे. अधूनमधून डोळे बंद करावेत, पाणी जास्त प्यावे. 
- डॉ. संतोष कदम, 
नेत्ररोगतज्ज्ञ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excessive use of mobiles is affecting the eyes and ears