हाताच्या बोटांची रचना मोबाईल वापरासाठी नाही ! वाढताहेत टेंडिनाईटीस, बेसिलार आर्थराइटीस व स्पॉंडिलायसिसचे विकार 

अनुराग सुतकर 
Saturday, 16 January 2021

मुळातच मानवी मणक्‍याचे स्नायू प्रचंड कमकुवत असतात, पण व्यायामाचा अभाव आणि संगणक व मोबाईल यांच्यातील वापरामुळे मानदुखी चालू होते. आपण जेवण करतो आणि मोबाईलमध्ये लक्ष घालत तसंच झोपी जातो, त्यामुळे जेवणातून ज्या कॅलरीज मिळतात त्या शरीराची कोणतीच हालचाल न केल्यामुळे साठून राहतात. मग हळूहळू लठ्ठपणा वाढतो, वजन वाढते, वाढलेल्या वजनाचा अतिरिक्त भार गुडघ्यांवर आणि मणक्‍यांवर पडतो. 

सोलापूर : आजकालच्या फास्ट जगतातील युवकांमध्ये माणूस सर्व गोष्टी या कमी वेळात कशा मिळतील याच्या पाठीमागे धावत आहे. त्यातच त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि त्याचे हवेत उडण्याचं स्वप्न देखील सत्यात उतरलं. तंत्रज्ञानामुळे जग सोशल मीडिया, इलेक्‍ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून किती जरी जवळ आले असले तरी प्रत्यक्षात मात्र संवादाची कमतरता म्हणजेच कम्युनिकेशन गॅप वाढत चाललेला आहे. आता तर संपूर्ण जग माणसाच्या खिशात आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचं कारण आहे मोबाईल ! 

भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास 80 ते 85 टक्के जणांकडे मोबाईल आहेत, तेही नवं तंत्रज्ञान विकसित असलेले. आता वेळेनुसार आणि काळानुसार घरबसल्या आपण कोणतीही गोष्ट सहज मिळू शकतो. परंतु त्यामागे त्या गोष्टीचे दुष्परिणाम देखील आपण भोगतोय हे ही नक्की. मोबाईल वापराचा मानवी झाडांवर होणारे दुष्परिणाम हे किती घातक असू शकतो, हे या भागात आपण पाहणार आहोत. मानवी शरीराची संरचना संपूर्णतः पाठीच्या कणावर आधारित आहे. त्याच्यापुढे हाताचे आणि पायाचे हाडे जोडण्यात महत्त्वाची भूमिका ही पाठीच्या मणक्‍यांद्वारे बजावली जाते. प्रत्येक वेळी मोबाईल पाहताना आपल्या मानेची स्थिती व त्या वेळी मानेवर येणारा ताण याकडे आपण दुर्लक्ष करतो. कारण, मोबाईलमधल्या मनोरंजनाच्या गोष्टीला एवढे बळी पडतो, की मानवी चेतनाक्षमता हे कमकुवत होत आहे हे आपल्याला जाणवत नाही. 

मुळातच मानवी मणक्‍याचे स्नायू प्रचंड कमकुवत असतात, पण व्यायामाचा अभाव आणि संगणक व मोबाईल यांच्यातील वापरामुळे मानदुखी चालू होते. आपण जेवण करतो आणि मोबाईलमध्ये लक्ष घालत तसंच झोपी जातो, त्यामुळे जेवणातून ज्या कॅलरीज मिळतात त्या शरीराची कोणतीच हालचाल न केल्यामुळे साठून राहतात. मग हळूहळू लठ्ठपणा वाढतो, वजन वाढते, वाढलेल्या वजनाचा अतिरिक्त भार गुडघ्यांवर आणि मणक्‍यांवर पडतो. त्यामुळे पाठीचे व गुडघ्याचे दुखणे याचे प्रमाण वाढते. त्याचे दुष्परिणाम हे शरीरावर होतात. अशा दुखण्यांवर गोळ्या- मलम हे तितक्‍यापुरतेच काम करते, बाकी हे दुखणे कायम राहते. त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, स्नायूंची हालचाल करणे या गोष्टी गरजेचे आहेत आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे मोबाईलचा अतिरिक्त वापर हा टाळला पाहिजे, हेच या सर्व आजारांवर रामबाण उपाय आहे, हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. 

गेली काही महिने कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाउन होता. त्यामुळे घरात बसून राहणे याशिवाय पर्याय नव्हता. घरात बसून मोबाईलवर वेबसिरीज बघणे, सतत मोबाईल बघणे यामुळे उजव्या हाताचा भाग मानेपर्यंत सतत दुखत होता. डॉक्‍टरांनी सांगितले झोपेत अवघडले आहे. परंतु पुढे जाऊन मला लक्षात आले, की हे दुखणे सततच्या मोबाईल वापराने झाले आहे. त्यामुळे मी तर आता मोबाईलचा अतिरेक वापर टाळत आहे, जेणेकरून स्नायूंचं दुखणं थांबण्यास मदत होईल. 
- ऋतुराज सरवदे 

मोबाईल वापरल्यामुळे हाडांचा ठिसूळपणा वाढण्याचे जरी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले नसले तरी मोबाईलच्या अतिवापरामुळे हाताच्या अंगठ्याचे वेगवेगळे आजार उद्भवत आहेत, असे निदर्शनास येते. आपल्या हातांची व बोटांची नैसर्गिक रचना ही मोबाईल वापरण्यासाठी बनलेली नाही, तरीसुद्धा आपण मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याची हालचाल करणारे स्नायूबंध (लिगामेंट व टेंडन) ची झीज होते. जेणेकरून त्यांच्या आवरणावर सूज निर्माण होते, याला आपण टेंडिनाईटीस आणि सायनोवायटीस म्हणतो. यालाच स्मार्टफोन टेंडिनाईटीस असेही म्हणतात. तसेच ट्रिगर थंब आणि बेसिलार आर्थराइटीस होतो व मानेचे व मणक्‍यांचे आजार (स्पॉंडिलायसिस) देखील होतात. 
- डॉ. अविनाश कुलकर्णी, 
अस्थिरोग तज्ज्ञ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excessive use of mobiles starts the onset of bone diseases