करमाळ्याच्या राजकारणात "व्हायरल क्‍लिप'चा बॉम्ब ! माजी आमदार जगताप व अप्पासाहेब झांजुर्णे यांच्यातील संवादाने खळबळ 

अण्णा काळे 
Thursday, 5 November 2020

1 नोव्हेंबरच्या रात्रीपासून व्हायरल झालेल्या क्‍लिपमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप, मकाईचे अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे व एक पत्रकार असा संवाद असून, यामध्ये श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना रोहित पवार कसा भाडेतत्त्वावर चालवण्यास घेत आहेत... पवारांचे व्यापारी धोरण कसे आहे..? इथंपासून ते माजी राज्यमंत्री स्व. दिगंबरराव बागल हे जयवंतराव जगताप यांचे कसे कार्यकर्ते होते..., बागल-जगताप यांच्यातील "बंधुभाव'..., आदिनाथ व मकाई कारखान्याबरोबरच तालुक्‍याची झालेली वाताहत... याबरोबरच आर्थिक विषयांवर स्फोटक संवाद आहेत.

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील व्हॉट्‌सऍप ग्रुपवर तालुक्‍यातील ज्येष्ठ नेत्यांच्या स्फोटक संवादाची क्‍लिप व्हायरल झाली आहे. या क्‍लिपमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याविषयी अपशब्द वापरल्याबद्दल मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे यांचा करमाळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करत अप्पासाहेब झांजुर्णे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी केली आहे. 

याबाबत करमाळा पोलिस स्टेशनला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री. वारे यांनी निवेदन दिले आहे. या वेळी राष्ट्रवादीचे अरुण जगताप, तेजस ढेरे, भोजराज सुरवसे, सचिन नलावडे, चंद्रकांत जगदाळे उपस्थित होते. 1 नोव्हेंबर रोजी रात्रीपासून करमाळा तालुक्‍यातील अनेक व्हॉट्‌सऍप ग्रुपवर एक ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. या क्‍लिपमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप, मकाईचे अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे व एक पत्रकार असा संवाद असून हा संपूर्ण संवाद 26 मिनिटे 46 सेकंदांचा आहे. या क्‍लिपमध्ये श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना रोहित पवार कसा भाडेतत्त्वावर चालवण्यास घेत आहेत... पवारांचे व्यापारी धोरण कसे आहे..? इथंपासून ते माजी राज्यमंत्री स्व. दिगंबरराव बागल हे जयवंतराव जगताप यांचे कसे कार्यकर्ते होते..., बागल-जगताप यांच्यातील "बंधुभाव'..., आदिनाथ व मकाई कारखान्याबरोबरच तालुक्‍याची झालेली वाताहत... याबरोबरच आर्थिक विषयांवर स्फोटक संवाद आहेत. 

आदिनाथ साखर कारखाना सहकारीच राहावा असाही सूर या संभाषणात आहे. या संवादाची क्‍लिप व्हायरल झाल्याने सध्या तालुक्‍यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. श्री. झांजुर्णे हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात तर माजी आमदार जगताप यांनी नुकतीच बारामती येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या क्‍लिपविषयी कमालीची चर्चा रंगली आहे. 

या क्‍लिपबाबत माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले, वास्तविक अशा क्‍लिप व्हायरल होऊ नयेत. या क्‍लिपमधील माझे बोलणे सत्य व वस्तुस्थितीला धरूनच आहे. ज्यांच्यामुळे तालुक्‍याची ही परिस्थिती झाली त्यांच्याविषयी जे बोललोय ते सत्यच आहे. आज आदिनाथ कारखाना आणि मकाई कारखान्याचे खऱ्या अर्थाने कोणी वाटोळे केले, हेही लक्षात घेतले पाहिजे. 

मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल म्हणाले, व्हायरल क्‍लिपमधील संभाषणातून कुणाची काय वृत्ती आहे, हे जनतेने समजून घ्यावे. आम्हाला शरद पवार वंदनीयच आहेत. या क्‍लिपविषयी आम्ही काय बोलण्यापेक्षा कुणाचे काय विचार आहेत, हे समजून घेऊनच जनतेने भविष्यात वागावे. 

मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे म्हणाले, आमचे दैवत असलेल्या शरद पवार यांचा मी सुरवातीपासून कार्यकर्ता आहे. व्हायरल झालेल्या क्‍लिपमधून गैरअर्थ काढला जात आहे. विश्वासघात ही ज्यांची कला आहे, त्यांनी कोण कोणाला काय बोलले याविषयी बोलू नये. बागलांनी असल्या गोष्टीचे भांडवल करण्यापेक्षा त्यांचे कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे. क्‍लिपमध्ये काय बोलणे झाले, यापेक्षा बागलांनी एक चांगले काम केल्याचे उदाहरण द्यावे. बागलांनी आदिनाथ व मकाई कारखान्याविषयी बोलावे. नाकर्तेपणा झाकण्यासाठी हे कशाचे तरी भांडवल करत आहेत. 

करमाळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्याविषयीचे बोलणे आम्ही खपवून घेणार नाही. जे पवारांच्या जीवावर मोठे झाले तेच चुकीचे बोलत असतील तर आम्ही त्यांचा निषेध करतो. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excitement over the dialogue between former MLA Jagtap and Appasaheb Zanjurne