मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षकाने केला 201 किलोमीटरचा प्रवास एसटीने ! 

रमेश दास 
Wednesday, 2 December 2020

मंगळवारी (ता. 1) झालेल्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील नरखेड (ता. मोहोळ) येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजाविण्यासाठी एका पदवीधर शिक्षकाने सांगली ते नरखेड असा तब्बल 201 किलोमीटरचा प्रवास एसटी बसने करून मतदान केले. शंकर महावीर ढेरे असे त्यांचे नाव आहे. 

वाळूज (सोलापूर) : मंगळवारी (ता. 1) झालेल्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील नरखेड (ता. मोहोळ) येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजाविण्यासाठी एका पदवीधर शिक्षकाने सांगली ते नरखेड असा तब्बल 201 किलोमीटरचा प्रवास एसटी बसने करून मतदान केले. शंकर महावीर ढेरे असे त्यांचे नाव आहे. 

आजकाल अशिक्षित व सुशिक्षितांमध्येही मतदानाचा हक्क बजावण्याबाबत अनुत्साह दिसून येत आहे. मतदाना दिवशीच्या सुटीचा वापर मतदानासाठी न करता काही जण प्रवासाचा बेत आखतात. यामुळेच अलीकडे देशातील मतदानाच्या टक्केवारी कमालीची घट होत असताना पाहायला मिळते. मात्र सांगली येथील शाळेत शिक्षक असलेल्या मतदाराने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी एसटीने प्रवास करून नरखेड गाठले. 

बोपले (ता. मोहोळ) येथील आणि सध्या पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर विद्यालय, महानगरपालिका शाळा क्रमांक - 42, संजयनगर, सांगली येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शंकर ढेरे यांनी सोमवारी झालेल्या पुणे पदवीधर मतदार संघातील मोहोळ तालुक्‍यातील नरखेड येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. झालेल्या पदवीधर मतदान प्रक्रियेत अनेक पदवीधर पुरुष आणि स्त्री मतदारांनी मतदान केंद्रापासून दहा, वीस किलोमीटरवर असून सुद्धा कंटाळा किंवा लांब असल्याचे कारण देत मतदान केले नाही. तर काही मतदारांचे नाव त्याच तालुक्‍यातील इतर ठिकाणच्या मतदान केंद्रावर होते. तेथे जाण्याचेही काही जणांनी टाळले. मात्र मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी सांगली ते नरखेड असा 201 किलोमीटरचा प्रवास करून आळशी मतदारांसमोर शंकर ढेरे या शिक्षकाने आदर्श उभा केला आहे. 

लोकशाहीमध्ये मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व असून, भारतीय लोकशाही जगातील सर्वांत चांगली लोकशाही आहे. पदवीधर मतदार हा सुशिक्षित मतदार म्हणून ओळखला जातो. मतदानाचा पवित्र हक्क हा प्रत्येक मतदाराने बजावलाच पाहिजे. त्यासाठीच मी मतदान करून आपली जबाबदारी पार पाडली आहे. 
- शंकर ढेरे,
पदवीधर शिक्षक, बोपले, ता. मोहोळ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To exercise the right to vote, the teacher traveled 201 km by ST