अरे व्वा ! टाकळीत एकरी 120 टन ऊस; कांदा आंतरपिकातून एक लाखाचे उत्पन्नही

Karche Sugarcane
Karche Sugarcane

जिंती (सोलापूर) : टाकळी (रा.), (ता. करमाळा) येथील 65 वर्षे वयाच्या "तरुण' शेतकऱ्याने ऊस पिकाचे एकरी 120 टन उत्पादन घेतले आहे. तर कांदा या आंतरपिकातून एक लाखाचे उत्पादन घेऊन या शेतकऱ्याने जिल्ह्यात शेती कशी करावी, याचा एक आदर्श परिपाठ निर्माण केला आहे. 

टाकळी हे गाव उजनी बॅकवॉटरच्या कडेला वसलेले पुनर्वसित गाव असून, गाव शंभर टक्के बागायती आहे. सतत ऊस पिकाची शेती केल्यामुळे या भागातील शेती नापीक बनत चालली आहे. परिणामी ऊस पिकाचे एकरी उत्पादन घटत आहे. शेती परवडत नाही, असा या भागातील शेतकऱ्यांचा सूर आहे. परंतु, या सर्व गोष्टींना टाकळीचे शेतकरी दत्तात्रय पांडुरंग कर्चे हे अपवाद आहेत. त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एक एकर शेतीमध्ये 120 टन उसाचे उत्पादन घेऊन कांद्याच्या आंतर पिकातून एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 

श्री. कर्चे यांची टाकळी येथे तीन एकर शेती आहे. त्यांनी गतवर्षी ऑगस्ट महिन्यात 86032 या जातीची आडसाली उसाची लागवड केली. त्यामध्ये आंतरपीक म्हणून कांदा व हरभऱ्याची लागवड केली होती. सुरवातीला 15ः15ः15 एकरी तीन बॅग खताची मात्रा दिली. या आंतर पिकामधून कांद्याचे एक लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले असून, हरभराही पाच पोती झाला आहे. आंतरपीक काढल्यानंतर ऊस बांधणीच्या वेळी उसाला एकरी चाळीस पिशव्या कोंबडखत घातले होते. याव्यतिरिक्त कसलेही खत उसाला घातलेले नाही. कमीत कमी खर्चात एकरी 120 टन उसाचे उत्पादन कर्चे यांनी आपल्या शेतामधून घेले आहे. 
उसाला चाळीस ते पंचेचाळीस कांड्या आहेत. चार ते पाच किलो एवढे एका उसाचे वजन आहे. बारामती ऍग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी कर्चे यांच्या ऊस शेतीची पाहणी करून कौतुक केले. 

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करायला मला आवडतात. आमची तीन एकर बागायती शेती टाकळी येथे आहे. दीड एकरमध्ये आडसाली ऊस लागवड केली होती. त्यामधील उसाची तोडणी झाली आहे. या शेतातील ऊस बारामती ऍग्रो कारखान्याला गेला आहे. त्या उसाला एकरामध्ये 120 टन उत्पादन मिळाले आहे. अतिशय कमी खर्चात आंतरपीक घेऊन हे उत्पादन घेतले आहे. एकरी बारा हजार रुपये खर्च झाला आहे. आम्ही घरीच शेती करतो. माझी दोन मुले नोकरीला आहेत. त्यामुळे आम्ही पती-पत्नी दोघेच शेती करतो. 
- दत्तात्रय कर्चे, 
शेतकरी, टाकळी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com