Corona_Farmers.
Corona_Farmers.

पुन्हा लॉकडाउन नको रे बाबा ! सोशल मीडियावरील चर्चेने शेतकरी घायाळ तर छोटे व्यावसायिक चिंतेत 

केत्तूर (सोलापूर) : गतवर्षी 22 मार्च 2020 रोजी कोरोना महामारीचा संसर्ग वाढू नये यासाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे तीन-चार महिने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाहतूक तसेच मार्केट बंद झाल्याने शेतातील तयार पिके बाहेर नेता येत नव्हती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. मागील मोठ्या संकटातून शेतकरी उभारी घेत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाउन होणार, अशी चर्चा सोशल मीडियावर जोरकसपणे व्हायरल होत असल्याने शेतकऱ्यांपुढे चिंता वाढली आहे. 

गतवर्षी बाजारपेठा बंद असल्याने शेतात तयार झालेला शेतीमाल बाहेर नेता आला नाही, त्यामुळे तो शेतातच नासून गेला किंवा सोडून द्यावा लागला होता. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. त्याबरोबरच शेतमजुरांपुढेही उदरनिर्वाहाचा वाचा प्रश्न उभा राहिला होता. शेतकऱ्यांनी मात्र झाले गेले विसरून पुन्हा उभारी घेत असतानाच, पिके जोमदार आली असतानाच पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. प्रशासनाने यापुढे पुन्हा लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला तर शेतकरी मात्र संपून जाणार आहे. 

कोरोनानंतर स्थिती पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्याने राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाने पुन्हा निर्बंध लागू केल्यास छोट्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या व्यापाऱ्यांनाही याचा जबर फटका बसणार आहे. लग्न, सांस्कृतिक, क्रीडा तसेच देवालय यांवरही निर्बंध आल्यास आर्थिक उलाढालीला ब्रेक बसणार असल्याने व्यावसायिकही चिंतेत पडले आहेत. 

गतवर्षीप्रमाणे या वर्षीही शाळा पुन्हा एकदा बंद झाल्याने शालेय साहित्य विक्रेत्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. यापुढे नागरिकांना लॉकडाउन नको असल्यास नागरिकांनी स्वयंशिस्तीने प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे व निर्बंधांचे काटेकोर पालन करणे महत्त्वाचे आहे; अन्यथा लॉकडाउन खरोखर झाल्यास आर्थिक संकटाचा सामना सर्वांना निश्‍चितच करावा लागणार आहे. धार्मिक कार्यक्रमांवरही निर्बंध घालण्यात आल्याने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामीण भागातील ग्रामदेवतांच्या जत्रा, यात्रा, उत्सव कोरोनाच्या सावटाखालीच राहणार आहेत. तसेच लग्नमुहूर्तही पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची वेळ वधू-वर मंडळींवर आली आहे. 

कोरोना रुग्णांच्या संख्येत वरचेवर वाढ होऊ लागल्याने लॉकडाउनची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची मात्र झोप उडाली आहे. 
- सचिन भोईटे, 
शेतकरी, वाशिंबे 

पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ आली तर शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. लॉकडाउन करावयाचे झाल्यास शासनाने शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. 
- संतोष इंगळे, 
शेतकरी, मांजरगाव 

लॉकडाउननंतरच्या शिथिलतेनंतर सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे अवघड झाले आहे. महागाईने सर्वसामान्यांचे बजेट मात्र कोलमडले आहे. 
- मनोज कटारिया, 
नागरिक, केत्तूर 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने शाळा पुन्हा एकदा बंद केली आहे. त्यामुळे पाल्याच्या भवितव्याची चिंता लागली आहे. 
- ज्ञानेश्वर शिंदे, 
पालक, केत्तूर 

कोरोना संसर्गाचे संकट विचारात घेता सण, लग्नसमारंभ अशा प्रसंगी सर्वांनीच जबाबदारीचे भान ठेवणे आवश्‍यक झाले आहे. 
- जगदीश अग्रवाल, 
करमाळा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com