
सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचं कोठार म्हटले जाते. त्यातही मंगळवेढा, मोहोळ, माढा, अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, करमाळा हे तालुके प्रसिद्ध पांढऱ्याशुभ्र टपोऱ्या मालदांडी ज्वारीचे उत्पादन घेणारे तालुके आहेत. इतर तालुक्यांतही ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
वाळूज (सोलापूर) : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पडलेल्या तुफान पावसामुळ जलाशयांमध्ये आजही चांगला पाणीसाठा असून, भूगर्भातील पाणी पातळीतही चांगली वाढ झाली आहे. पिकांना वेळच्या वेळी पाणी मिळत असल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू ही पिके जोमाने वाढली आहेत. शेतात बहरलेली पिके पाहून "औंदा ज्वारी, हरभरा बक्कळ पिकणार; ज्वारीचं कोठार गच्च भरणार' असे शेतकरी म्हणत आहेत.
सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचं कोठार म्हटले जाते. त्यातही मंगळवेढा, मोहोळ, माढा, अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, करमाळा हे तालुके प्रसिद्ध पांढऱ्याशुभ्र टपोऱ्या मालदांडी ज्वारीचे उत्पादन घेणारे तालुके आहेत. इतर तालुक्यांतही ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मोहोळ तालुक्यातून भीमा, सीना व भोगावती या प्रमुख नद्या वाहतात. नद्यांकाठचा शिवार काळ्या कसदार मातीचा आहे. काही ठिकाणी नदीकाठी जमिनीला धर नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी हे प्रमुख पीक आहे. मागील पावसाळ्याच्या उत्तरार्धात मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतातील तालीमध्ये मोठा पाणीसाठा झाला होता. सततच्या पावसाने जमिनीला लवकर वाफसा न झाल्याने पेरा उशिरा झाला. त्यामुळे हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे.
गेल्या पावसाळ्यात न भूतो न भविष्यती असा पाऊस कोसळला आणि बारमाही कोरड्या असणाऱ्या नद्यांनाही महापूर आले. कधीही न भरणारे प्रकल्प ओसंडून वाहू लागले. एरव्ही याच दिवसांत उणे पाणीसाठा असलेल्या उजनी धरणात यंदा मात्र शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. कारण, गेल्या पावसाळ्याच्या शेवटी झालेली अतिवृष्टी. यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. मात्र पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ज्वारी, हरभरा, गहू ही पिके जोमाने वाढली आहेत. सध्या ज्वारीचे पीक कुठे पोटऱ्यात, कुठे निसवले आहे तर कुठे हुरड्यात आहे. ज्वारीच्या कणसांवरील हुरड्यात आलेल्या ज्वारीच्या कोवळ्या दाण्यांवर पक्षी ताव मारत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल