अवकाळीसोबतच्या लढाईत बळिराजा हतबल ! मळेगाव परिसरात द्राक्ष, ज्वारी, हरभरा, गहू, कांद्याचे प्रचंड नुकसान 

Crop Loss
Crop Loss

मळेगाव (सोलापूर) : "संकटे ही भित्री असतात, ती कधीच एकटी येत नसतात. त्यामुळे त्यांचा मोठ्या धैर्याने व जिद्दीने सामना करणे गरजेचे आहे,' हे वाक्‍य व शिकवण आहे राजमाता मॉं जिजाऊसाहेब यांची. त्याचाच आदर्श घेत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कोरोना, दुष्काळ, ढगफुटी, वादळे यांसारख्या संकटांना सामोरे जातो आहे. मात्र सततच्या येणाऱ्या अस्मानी व सुलतानी संकटामुळे बळिराजा मात्र पुरता हतबल झाला आहे. ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या जखमा ताज्या असतानाच शुक्रवारी (ता. 19) पहाटे तीन वाजता विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. 

मळेगाव परिसरातील पिंपरी (सा), हिंगणी, साकत, उपळे, नांदणी, घाणेगाव, बावी, ढाळे पिंपळगाव, जामगाव, महागाव, घाणेगाव येथे पहाटे तीन वाजता मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात विक्रीला आलेली द्राक्षं, ऊस, मका, गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, खरबूज, कलिंगड पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भविष्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. 

अवकाळी पावसात उभी असलेली ज्वारी भुईसपाट झाली. विक्रीला आलेली द्राक्षं पावसामुळे खराब झाली. तेजीत असलेला कांदा पावसाच्या पाण्यात मातीमोल झाला. शेतात काढून पडलेला गहू व हरभरा पावसाच्या पाण्यात भिजला आहे. त्यामुळे मोठ्या आर्थिक उत्पन्नाची अपेक्षा ठेवून बसलेल्या शेतकऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. सततच्या संकटांमुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. 

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाउनबाबत केलेल्या विधानाने शेतकरी मात्र संभ्रमावस्थेत सापडला आहे. त्यात अवकाळी पावसाचीही भर पडल्याने व्यापारी वर्गाने माल खरेदी करण्यासाठी पाठ फिरवली आहे. 2020 प्रमाणे 2021 मध्येही शेतकरी अवकाळी व कोरोनाच्या चक्रव्यूहात सापडतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

शुक्रवारी पहाटे तीन वाजता आलेल्या मुसळधार पावसात माझ्या तीन एकर ज्वारीचे पीक संपूर्ण भुईसपाट झाले आहे. ज्वारी मातीमोल झाली असून यावर्षी ज्वारी काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. 
- जयराम काशीद, 
ज्वारी उत्पादक शेतकरी 

मंगळवारपासून बदललेल्या ढगाळ व खराब हवामानाचा मोठा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. त्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे तर विक्रीला आलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा शासनाने विचार करावा व लॉकडाउन सुरू करताना शेतकरी वर्गाचा विचार करून निर्णय घ्यावा. 
- समाधान काटमोरे, 
द्राक्ष उत्पादक शेतकरी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com