बार्शी तालुक्‍यातील शेतकरी पुन्हा वळतोय ऊस पिकाकडे ! 

प्रशांत काळे 
Sunday, 6 December 2020

ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना कायम अडचणीला तोंड द्यावे लागल्याने ऊस पीक नकोच, अशी भावना होऊन दूर गेलेला शेतकरी पुन्हा या वर्षीपासून ऊस लागवडीसाठी उत्सुक होताना दिसत आहे. तालुक्‍यात इंद्रेश्वर शुगर्स हा एकमेव कारखाना सुरू असून, सहा लाख टन ऊस गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे. 

बार्शी (सोलापूर) : पूर्णपणे निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असणारा बार्शी तालुका. उपसा सिंचन योजना रखडल्याने सिंचनाद्वारे पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने ऊस पीक लागवडीसाठी शेतकरी अद्यापही धजावत नाही. रब्बीच्या ज्वारी, गहू, हरभरा तसेच खरिपातील तूर व इतर भाजीपाला, कांदा, फळे याकडे शेतकऱ्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केले असून, यावर्षी पाऊस जास्त झाल्याने शेतकरी पुन्हा ऊस पिकाकडे वळताना दिसत आहे. 

ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना कायम अडचणीला तोंड द्यावे लागल्याने ऊस पीक नकोच, अशी भावना होऊन दूर गेलेला शेतकरी पुन्हा या वर्षीपासून ऊस लागवडीसाठी उत्सुक होताना दिसत आहे. तालुक्‍यात इंद्रेश्वर शुगर्स हा एकमेव कारखाना सुरू असून, सहा लाख टन ऊस गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे. 

वैराग येथील संतनाथ सहकारी कारखाना बंद पडल्यानंतर शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी खूप त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर खामगाव येथे आर्यन शुगर कारखाना सुरू झाला. तोही जास्त काळ टिकला नाही. बंद पडताच पुन्हा दुसऱ्या तालुक्‍यातील कारखान्याकडे हेलपाटे मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. अनेकांची बिले कारखान्याकडे अडकल्याने शेतकरी अडचणीत आला. यापुढे कारखाना चांगला असल्याशिवाय ऊस पीक घ्यायलाच नको, असं मत शेतकऱ्यांचे झाले. 

खांडवी येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंद्रेश्वर शुगर्स हा साखर कारखाना सुरू केला. बार्शी तालुक्‍यातील दहा ते अकरा हजार शेतकरी या कारखान्याचे सभासद असून, मागील एक महिन्यात 1 लाख 59 हजार 388 टन उसाचे गाळप झाले आहे. 

इंद्रेश्वर शुगर मागील दहा वर्षांपासून ऊस गाळप करीत असून, तालुक्‍यात ऊस पिकाची क्षेत्रवाढ झाली आहे. कारखान्याचे तालुक्‍यातील सुमारे 11 हजार शेतकरी सभासद आहेत. एका महिन्यात 1 लाख 59 हजार 388 टन उसाचे गाळप झाले असून, 6 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत ऊसदर जाहीर करण्यात येईल. 
- अशोक जाधव, 
व्यवस्थापक, इंद्रेश्वर शुगर्स, खांडवी 

यावर्षी ऊस लागवड क्षेत्र वाढणार आहे. यावर्षी पूर्वहंगामी 122 हेक्‍टर, सुरू 3 हजार 215 हेक्‍टर तर खोडवा 384 हेक्‍टर अशी एकूण 3 हजार 722 हेक्‍टर ऊस लागवड गाळपासाठी आहे. पाणी भरपूर असल्याने शेतकरी रिकामे क्षेत्र असलेल्या ठिकाणी ऊस लागवड करणार आहे. 
- शहाजी कदम, 
कृषी अधिकारी, बार्शी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Barshi taluka are turning to sugarcane again