ऊसदराबाबत उदासीनता ! करमाळा तालुक्‍याबाहेरील कारखान्यांना ऊस देण्याकडे शेतकऱ्यांचा कल 

sugar-factory
sugar-factory

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. साधारणपणे 24 ते 28 लाख मेट्रिक टन उसाचे उत्पन्न अपेक्षित आहे. तालुक्‍यात श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना, श्री मकाई सहकारी साखर कारखाना, भैरवनाथ शुगर, विहाळ आणि विठ्ठल रिफाइंड शुगर, पांडे हे चार साखर कारखाने आहेत. चार साखर कारखान्यांपैकी तीन कारखाने सुरू झाले आहेत तर श्री आदिनाथ साखर कारखाना दोन वर्षांपासून बंद आहे. तालुक्‍यातील श्री कमलाभवानी शुगर, भैरवनाथ शुगर, विहार व मकाई सहकारी साखर कारखाना हे तीन साखर कारखाने सुरू झाले आहेत. चार साखर कारखाने तालुक्‍यात असतानाही तालुक्‍याबाहेरील साखर कारखान्यांना ऊस देण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. 

करमाळा तालुक्‍यातील ऊस बाहेरील 15 साखर कारखाने घेऊन जात आहेत. याशिवाय पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस तालुक्‍यातील साखर कारखाने ऊस गाळपासाठी घेऊन जात आहेत. तालुक्‍यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भावना करमाळा तालुक्‍यातील साखर कारखान्यांना ऊस देण्यापेक्षा तालुक्‍याबाहेरील साखर कारखान्यांना ऊस देण्यावर जास्त आहे, त्यामुळे तालुक्‍यातील कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. 

ही परिस्थिती तालुक्‍यातील कारखान्यांच्या बाबतीत का निर्माण झाली, तर त्याचे एकमेव कारण म्हणजे तालुक्‍यातील साखर कारखान्यांनी दराबाबत दाखविलेली उदासीनता होय. त्या तुलनेत अंबालिका शुगर (राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) व बारामती ऍग्रो या साखर कारखान्यांना ऊस घालण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा दिसून येत आहे. अंबालिका शुगर व बारामती ऍग्रोची टोळी मिळविण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे कमलाभवानी शुगर, मकाई सहकारी साखर कारखाना व भैरवनाथ शुगर, विहाळ या साखर कारखान्यांना ऊस देताना शेतकरी नाइलाज म्हणून ऊस देत असल्याचे चित्र आहे. 

तालुक्‍यात अद्याप एकाही साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर केला नाही किंवा ऊस दराबाबत कुठलीही वाच्यता केली नाही. गेल्या वर्षी तालुक्‍यातील साखर कारखान्यांच्या तुलनेत बाहेरील साखर कारखान्यांनी जादाचा भाव दिल्याने शेतकरी नुकसान सहन करण्यास तयार नाहीत. त्यामुळे जादा भाव देणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस घालण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. कंदर, केम परिसरातील ऊस विठ्ठलराव शिंदे, पिपंळनेरला देण्यावर शेतकऱ्यांचा कल आहे. बाहेरील साखर कारखान्यांना ऊस जात असल्याने तालुक्‍यातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालवण्याची कसरत करावी लागत आहे. 

अंबालिका शुगरच्या तालुक्‍यात 270 टोळ्या असून, दररोज जेऊर 70 हजार 450, जिंती 50 हजार 900, वाशिंबे गटातून 27 हजार 215 टन एवढा ऊस गाळप केला असून, 2200 रुपयांचा पहिला हप्ता जमा केला आहे. तर गेल्यावर्षी 2650 रुपये दर दिला आहे. 

मकाई सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत 20 हजार 208 टन उसाचे गाळप केले आहे. साडेतीन लाख टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. मात्र यावर्षी मकाई कारखाना उशिरा सुरू झाल्याने हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. 

भैरवनाथ शुगर, विहाळने आतापर्यंत 1 लाख 10 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्यांनी सहा लाख मेट्रिक टन उसाचे उद्दिष्ट ठेवले आहे. विठ्ठल रिफाइंड शुगर, पांडे या साखर कारखान्याने आतापर्यंत 1 लाख 26 हजार 20 गाळप केले आहे. तर 1 लाख 2 हजार 650 क्विंटल साखर तयार झाली आहे. या साखर कारखान्याने 9 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com