
कांदा पिकात एक लहान अळी कांद्यावर हल्ला करून आतला गाभा खाते. जोपर्यंत काद्यांची मुळी काम करते तोपर्यंत पीक हिरवे दिसते, मात्र बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने कालांतराने हे पीक मरून जाते.
वैराग (सोलापूर) : नव्याने लागवड केलेल्या कांदा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. बुरशीने रोप सडून चालले आहे, तर जे रोप जगले आहे, त्याच्या कांद्याच्या गाभ्यात एका विचित्र अळीने प्रवेश करून आतला गाभा फस्त केल्याचा प्रकार दिसत आहे. परिणामी अनेक ठिकाणी रोपांची मर झाल्याचे दिसून येत आहे. रोप उपटल्यानंतर कांदा पूर्णत: सडलेला दिसून येतो. कांद्यावर आलेल्या महामारीमुळे बार्शी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे धास्तावला आहे.
वैराग परिसरात कांदा उत्पादनाचे क्षेत्र मोठे आहे. उत्तम प्रतीच्या फुरसंगी कांद्याचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. याही वर्षी या भागात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. मात्र कांद्याच्या साडेसातीचा त्रास सहन करावा लागतो आहे. शेतकऱ्यांनी महागडे कांदा बियाणे सुमारे 5 हजार 500 रुपये किलो उच्चांकी दराने घेऊन रोपे तयार केली आहेत. वादळी पावसाने 30 टक्के रोपे वाया गेली. शेताची नांगरट, मशागत करणे, कुळवणी, सरी टाकणे आदींसह लागवड मजुरीचा खर्च करून आर्थिकदृष्ट्या शेतकरी कर्जबाजारी झाला. शिवाय खते - औषधे, फवारणी, काढणी याबाबत शेतकऱ्याच्या खिशाला आणखी कात्री लागत असल्याने त्यात हवामानातील बदल हे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर घालणारे ठरत आहे.
कांदा पिकात एक लहान अळी कांद्यावर हल्ला करून आतला गाभा खाते. जोपर्यंत काद्यांची मुळी काम करते तोपर्यंत पीक हिरवे दिसते, मात्र बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने कालांतराने हे पीक मरून जाते. अशा परिस्थितीत जेथे रोपांची मर दिसून येईल तेथे एक वेळेस निरोगी आणि मेलेल्या कांदा रोपांची उपटून तपासणी करून बघावी. अळी आढळून आल्यास कोरोसायपर, डायक्लोरोव्हान्स, कारटॅप, हायड्रोक्लोराइड यापैकी एक व बुरशी असेल तर आपणास योग्य वाटते त्यानुसार इतर बुरशीनाशक कीटकनाशके शिफारस केलेल्या प्रमाणात वापरावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
कांद्याचे रोप तीन ते चार वेळा टाकले. यंदा मात्र कांद्याचे वांदे झाले. बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने बुरशीने रोप सडले, तर लागवड केलेल्या कांद्याचा गाभा अळीने खाल्ला आहे.
- कमलाकर क्षीरसागर,
कांदा उत्पादक शेतकरी, मुंगशी (वा.), ता. बार्शी
संपादन : श्रीनिवास दुध्याल