मंगळवेढ्यातील सत्तासंघर्षात निवडणुकीला गालबोट ! पराभवाची संक्रांत कोणावर व विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?

हुकूम मुलाणी 
Sunday, 17 January 2021

केवळ राजकीय प्रतिष्ठेपोटी गावगाड्यातील नेत्यांनी आपली झोळी रिकामी केली. नंदेश्वर येथे उमेदवारी अर्ज का मागे घेतला नाही? या कारणावरून मतदान संपल्यावर वाद उकरून काढला तर सिद्धापूर येथे मतदारावरून वाद झाला. बालाजीनगर येथे चक्क होमगार्डला धमकावण्यात आले.  

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायतीच्या 186 जागेसाठी 464 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र मोठी चुरस पहावयास मिळाली. परंतु चुरशीच्या निमित्ताने झालेल्या वादातून नंदेश्वर, सिध्दापूर, बालाजी नगरात गालबोट लागले. विजयाबाबत सर्वच गट आपले दावे करत असले तरी पराभवाची संक्रांत कोणावर बसणार हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.
 
तालुक्‍यातील 22 गावातील मरवडे, नंदेश्वर, हुलजंती, सिद्धपूर, बोराळे ही गावे मोठी असल्यामुळे या गावाच्या निकालाकडे सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांचे लक्ष असून या गावातील राजकीय हालचालीकडे निवडणूक जाहीर झाल्यापासून लक्ष दिले. आत्तापर्यंत शहरातील निवडणुकीत मोठी चुरस, आर्थिक व्यवहार आणि मतदारांची चोचले पुरवले गेल्याचे ऐकत होतो. परंतु तशीच अगदी पुनरावृत्ती ग्रामीण भागातील ज्या गावांचे आर्थिक उत्पन्न नगण्य आहे. अशा गावात देखील पहावयास मिळाली. केवळ राजकीय प्रतिष्ठेपोटी गावगाड्यातील नेत्यांनी आपली झोळी रिकामी केली. नंदेश्वर येथे उमेदवारी अर्ज का मागे घेतला नाही? या कारणावरून मतदान संपल्यावर वाद उकरून काढला तर सिद्धापूर येथे मतदारावरून वाद झाला. बालाजीनगर येथे चक्क होमगार्डला धमकावण्यात आले.  

सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आगामी विधानसभेची पोटनिवडणूक व दामाजी कारखान्याची निवडणूक पाहता सर्वच नेत्यांनी समर्थकांना आपल्या गावात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध मार्गाने मदतीचा हात दिल्यामुळे ग्रामीण भागातील गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीवर आपल्या गटाचे वर्चस्व कसे राहील. यासाठी नेटाने प्रयत्न केले. गेल्या दोन दिवसापूर्वी मतदारांचा कौल आजमावण्याचा दृष्टीने सोशलमिडीयाचा वापर करत विविध प्रकारचे आमिष दाखवत मतदाराचे चोचले पुरवण्यात आले. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी तिर्थक्षेत्र विकासाचा निधी यामुळे अनेकांनी यात लक्ष घालत निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळे इतर वेळेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत चांगलीत चुरस पाहावयास मिळाली. इतर वेळी एकमेकांच्या विरोधात कुस्ती खेळणारे कार्यकर्ते या निवडणुकीत गावगाड्यातील सत्तेसाठी मात्र दोस्ती करताना दिसून आले. त्यामुळे गावगाड्यात आघाड्या सोयीनुसार झाल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काही ठिकाणी एकाच पक्षाचे दोन गट परस्परविरोधी लढताना दुसऱ्या गटाचा आधार घेऊन एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. उमेदवारी अर्ज अपात्र करण्यावरून येथील प्रकरण उच्च न्यायालयात गेले. या ठिकाणी दहा जागा यापूर्वीच बिनरोध निघाल्या, त्यामुळे पाच जागांसाठी निवडणूक झाली. हुलजंती, डोणज, सलगर बुद्रुक, महमदाबाद (शे), लवंगी, माचणूर, अरळी, तांडोर, आसबेवाडी, नंदेश्वर, कचरेवाडी, गणेशवाडी, लेंडवे चिंचाळे या ठिकाणी देखील लढत प्रतिष्ठेची झाली. मरवडे येथे तिरंगी लढतीत मोठी चुरस पाहावयास मिळाले. मोजकेच मतदान असल्यामुळे काहींना अंदाज करताना दमछाक होत आहे. निकालानंतर दोन्ही गटाकडून विजयाचे दावे केले जात आहेत. 
 
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून श्रमदानाची चळवळ एकोप्याने जोपासण्यामध्ये आसबेवाडी गावाने तालुक्‍याला आदर्श घालून दिला. राज्यात 75 लाखाचे बक्षीस मिळवले पण ग्रामपंचायतीवर सत्त्तेसाठी एकोपा न झाल्यामुळे झालेल्या निवडणुकीत चुरस होत मोठी खळबळ झाल्याची चर्चा आहे. 

सध्या बहुतांश गावांमध्ये 15 वा वित्त आयोगाचा निधी देखील प्राप्त झाला आहे. त्यामुळे थेट निधीमुळे अनेकांना गावगाड्यातील सत्तेची स्वप्ने पडू लागली. त्यामुळे सत्तेसाठी आपला खिसा मोकळा केला असला तरी विजयी उमेदवार आपला झालेला खर्च कामाच्या माध्यमातून काढू शकतो. मात्र पराभूत झालेल्या उमेदवाराला कर्जबाजारी होणे शिवाय पर्याय नाही. 

 

गेल्या पाच वर्षांमध्ये मरवडे गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावण्यात यश मिळाले. सूज्ञ जनतेने हा विकास रथ वेगवान व्हावा, यासाठी स्वाभिमानी पॅनलला भरभरुन साथ दिल्याने पॅनलचा विजय निश्‍चित आहे . 
- संजय पवार, गटनेता, स्वाभिमानी ग्रामविकास पॅनल मरवडे 

माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आ. प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नाने सिद्धापूर ते मातोळी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे या भागात लोकांची ये-जा वाढली. सिद्धापूरात, गौण खनिजच्या पाच कोटींच्या निधीतून विविध विकास कामे केली. व्यायामशाळा, वाचनालय, कॉंक्रीट रस्ते, अंतर्गत रस्त्याचे कामे केल्यामुळे गावात दळणवळणाची साधने उपलब्ध झाली. गावातील व परगावाहून येणाऱ्या लोकांना विविध सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केल्यामुळे मतदाराचा आमच्या पॅनलवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे उर्वरित विकास कामे करण्याच्या दृष्टीने लोकांकडून मातृलिंग कृपेने व मतदारांच्या सहकार्याने सत्ता आल्यानंतर राहिलेले काम पूर्ण करु 
- बापुराया चौगुले (सावकार), सिध्दापूर

 

संपादन : सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fate of 464 candidates for 186 seats of 22 Gram Panchayats in Mangalwedha taluka has been sealed in the ballot box