वडिलाने मुलासमोरच सोडला प्राण ! अतिवृष्टीमुळे 'सीईटी'साठी मुलासोबत आले होते; परीक्षेचा नंबर पहायला जाताना अपघात

2accident_4.jpg
2accident_4.jpg

सोलापूर : मुलाचा 'सीईटी' परीक्षेचा नंबर कुठे आला आहे, याची खात्री करण्यासाठी शरणबसप्पा म्हेत्रे हे दुचाकीवरुन (एमएच- 13, बीए- 0353) मुलासोबत सोमवारी (ता. 19) सकाळ पावणेनऊ वाजता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोरील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात जात होते. सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जात असतानाच पुण्याहून सोलापुकरकडे येणाऱ्या चारचाकी मालवाहतूक वाहनाने (एचएच- 05, डीके- 8493) धडक दिली. त्यात शरणबसप्पा म्हेत्रे हे गंभीर जखमी झाले आणि मुलासमोरच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.


ठळक बाबी...

  • मुलाच्या सीईटी परीक्षेनिमित्त दुचाकीवरुन सोलापुरात आलेल्या वडिलास काळाने गाठले
  • केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेटवर मुलाच्या परीक्षेचे सेंटर विचारायला जात होते
  • सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गालगत दुचाकी लावून रस्ता ओलांडत होते
  • पुण्याहून सोलापुरकडे येणाऱ्या वाहनाने वडिलास दिली धडक
  • गंभीर जखमी वडिलाने मुलाच्या डोळ्यात देखत घेतला अखेरचा श्‍वास; पेपर दिलाच नाही
  • मारहाणीच्या भितीने पळालेल्या वाहनचालकास पोलिसांनी केली अटक


हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शरणबसप्पा म्हेत्रे हे मुलाला गौडगाव (ता. अक्‍कलकोट) येथून दुचाकीवरुन सोलापुरात आले होते. सोमवारी (ता. 19) पावणेनऊ वाजता ते सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर पोहचले. त्यानंतर त्यांनी दुचाकी महामार्गालगत लावली आणि सिंहगड कॉलेजच्या गेटकडे निघाले. त्यावेळी पुण्याहून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहतूक चारचाकी वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात शरणबसप्पा खाली पडले आणि त्यांच्या डोक्‍याला, पायास व हाताला गंभीर दुखापत झाली. रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना पाहून मुलाला धक्‍काच बसला. क्षणातच होत्याचे नव्हते झाले आणि मुलगा परीक्षाच विसरुन गेला. अपघातानंतर मुलगा केदारने वडिलांना घेऊन रुग्णालय गाठले. मात्र, उपचारापूर्वीच वडिलांनी त्याच्या समोर प्राण सोडला. या दु:खद घटनेनंतर केदारने परीक्षा दिलीच नाही. शरणबसप्पा यांना तीन मुले असून तिन्ही मुले शिक्षण घेत आहेत. दोन नंबरच्या मुलाचा सोमवारी (ता. 19) सीईटीचा पेपर होता म्हणून सोलापुरात आले होते. अपघातानंतर पोलिसांनी वाहनचालकास अटक करुन त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन महिंद्रकर हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com