
हॉटेल व ढाब्यांवर मांसाहारी ग्राहकांसाठी मटन, चिकन व मासे असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. परंतु सध्या बर्ड फ्लूचा प्रभाव वाढत असताना चिकन खाणाऱ्यांची संख्या एकदम कमी झाली असून मटन, मासे खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. चिकनला मागणीच कमी असल्याचे हॉटेल व ढाबा चालकांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले.
केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर वर्षाच्या प्रारंभीच बर्ड फ्लूची भीती मात्र वाढली असून, त्यामुळे कोंबड्या खरेदी- विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे चिकन व्यवसायाला मोठा फटकाही बसला आहे. परिणामी मांसाहारप्रेमी खवय्यांनी आपला मोर्चा मटन व माशांकडे वळविल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात बर्ड फ्लूची साथ आली असून, अनेक ठिकाणी कावळे, चिमण्या, कोकिळा, बगळे, कबुतर आदी पक्ष्यांबरोबरच कोंबड्याही मृत झाल्याच्या बातम्या सोशल मीडिया, टीव्ही तसेच प्रिंट मीडियावरही प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मारापूर आदी गावांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने प्रशासनाने अनेक कोंबड्या व अंडी नष्ट केली आहेत. या सर्वांचा परिणाम कोंबड्या व अंडी विक्रीवर झाला आहे. मांसाहार प्रेमींनी आपला मोर्चा बोकडाचे मटन व माशांकडे वळविला आहे. त्यामुळे चिकन व्यवसायाला मात्र मोठा फटका बसला आहे. माशांना मागणी वाढली असली तरी त्यांचे दर मात्र स्थिर आहेत.
भीतीमुळे मांसाहारांनी दिली शाकाहाराला पसंती
बर्ड फ्लूचा प्रभाव आणि काही प्रमाणात विविध कारणांमुळे "मांसाहारापेक्षा शाकाहारच बरा' असे म्हणत नागरिकांनी सध्यातरी शाकाहाराला पसंती दिली आहे. अंडी, चिकन जास्त शिजवून खा, असे पशुसंवर्धन खात्याने सांगितले आहे. डॉक्टर मंडळींकडूनही तसा सल्ला दिला जात आहे. मात्र, नागरिक शाकाहाराला पसंती देत आहेत. केवळ भीतीमुळे मांसाहारप्रेमींनी चिकनकडे पाठ फिरवल्याने चिकनचे दर 200 रुपये किलोवरून थेट 80 रुपये किलोपर्यंत खाली घसरले आहेत. तसेच अंड्यांचे दरही घसरले आहेत.
हॉटेल व ढाब्यांवर मासे, मटनाला मागणी
हॉटेल व ढाब्यांवर मांसाहारी ग्राहकांसाठी मटन, चिकन व मासे असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. परंतु सध्या बर्ड फ्लूचा प्रभाव वाढत असताना चिकन खाणाऱ्यांची संख्या एकदम कमी झाली असून मटन, मासे खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. चिकनला मागणीच कमी असल्याचे हॉटेल व ढाबा चालकांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले.
कोरोना महामारीमुळे हॉटेल व्यवसाय डबघाईला आला होता; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू झाले असताना व हॉटेल व्यवसायही आता कुठे रुळावर येत असताना बर्ड फ्लू या संकटामुळे पुन्हा एकदा ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. ग्राहकांकडून चिकन, अंडीऐवजी बोकडाचे मटन, मासे याबरोबरच शाकाहारी जेवणाला मागणी वाढली आहे.
- शिवाजी शेलार,
हॉटेल व्यावसायिक
बर्ड फ्लूमुळे नागरिक मांसाहार टाळू लागल्याने व मांसाहारावर संक्रांत आल्याने शाकाहारी भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. त्यातच भाजीपाल्यांचे दरही कमी आहेत.
- अजित शेख,
भाजीपाला विक्रेता
संपादन : श्रीनिवास दुध्याल