esakal | परिणाम कोरोनाचा : भाजीपाल्याच्या दरात मासे ! मच्छी मार्केटकडे फिरकेनात व्यापारी व ग्राहक 

बोलून बातमी शोधा

Fish}

उजनी जलाशयाच्या गोड्या पाण्यातील माशांना राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या जलाशयाचे पाणी कमी होत असल्याने मासे सापडण्याचे प्रमाण वाढले असले तरी, भिगवण, इंदापूर मच्छी मार्केटमध्ये माशांचे दर घसरल्याने मच्छिमार संकटात येऊ लागले आहेत. 

solapur
परिणाम कोरोनाचा : भाजीपाल्याच्या दरात मासे ! मच्छी मार्केटकडे फिरकेनात व्यापारी व ग्राहक 
sakal_logo
By
राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : उजनी जलाशयाच्या गोड्या पाण्यातील माशांना राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या जलाशयाचे पाणी कमी होत असल्याने मासे सापडण्याचे प्रमाण वाढले असले तरी, भिगवण, इंदापूर मच्छी मार्केटमध्ये माशांचे दर घसरल्याने मच्छिमार संकटात येऊ लागले आहेत. 

उजनी जलाशयाच्या बॅकवॉटर भागात मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. मात्र, सध्या माशांची आवक वाढल्याने माशांचे दर मात्र अचानकपणे घसरले असून, 100 ते 150 रुपयांनी विक्री होणारा व उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणावर सापडला जाणारा चिलापी जातीचा मासा सध्या फक्त 30 ते 40 रुपये किलो या दराने विकला जात आहे. म्हणजेच भाजीपाल्याच्या दरात मासे मिळू लागले आहेत. 

मध्यंतरी जलाशयाचा पाणीसाठा मुबलक असल्याने माशांना लपण्यासाठी (अधिवासाच्या) जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नव्हत्या. परंतु सोलापूरसाठी पाणी सोडल्याने जलाशयातील पाणी कमी झाले आहे. या जागा आता रिकाम्या झाल्या असल्याने मच्छिमारांना मासे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु मच्छी मार्केटला दर मात्र मिळत नाही. 

राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा वाढू लागल्याने बाहेरून मासे खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना ब्रेक लागल्याने व मासेही नाशवंत असल्याने हे खराब होतील या भीतीने मार्केटला माशांचे दर कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मच्छी मार्केटला दर कमी झाले असले तरी स्थानिक बाजारात मात्र चढ्या भावाने माशांची विक्री केली जात असल्याने ग्राहकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. 

मध्यंतरी बर्ड फ्लूच्या संकटामुळे मांसाहार प्रेमींनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे माशांना मागणी वाढली होती. त्यामुळे माशांच्या दरातही वाढ झाली होती. त्या वेळी आवक कमी आणि मागणी जास्त होती. परंतु सध्या चित्र उलटे झाले आहे. माशांची आवक जास्त प्रमाणात होत असली तरी कोरोनाच्या भीतीने व्यापाऱ्यांचे येण्याचे प्रमाण कमी होत असल्याने माशांचे दर घसरले आहेत. 
- दत्तात्रय डिरे, 
मच्छिमार, केत्तूर 

जलाशयाचे पाणी कमी होत असल्याने यापुढेही मासे सापडण्याचे प्रमाण वाढणार आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला व मासे खरेदीसाठी मासे व्यापारी आलेच नाहीत तर संकटात भरच पडणार आहे. 
- दत्तात्रय कनिचे, 
मच्छिमार, केत्तूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल