
गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना व प्रत्येकाने मास्क वापरासह शासनाने दिलेले नियम पाळणे गरजेचे असताना कुर्डुवाडीत मात्र अनेकजण विनामास्क फिरताना दिसत आहेत. यामुळे कुर्डुवाडीमध्ये मास्कचे वावडे आहे का, असा प्रश्न पडतो आहे.
कुर्डुवाडी (सोलापूर) : गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना व प्रत्येकाने मास्क वापरासह शासनाने दिलेले नियम पाळणे गरजेचे असताना कुर्डुवाडीत मात्र अनेकजण विनामास्क फिरताना दिसत आहेत. यामुळे कुर्डुवाडीमध्ये मास्कचे वावडे आहे का, असा प्रश्न पडतो आहे.
काही जणांचे तर नाक - तोंड उघडे पण मास्क मात्र हनुवटीवर असतो. नागरिकांनी स्वतःहून मास्कचा योग्य वापर केला पाहिजे व न करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सूज्ञ नागरिकांकडून होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुख्याधिकारी समीर भूमकर, स्वच्छता निरीक्षक तुकाराम पायगण, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष अडगळे, शहरातील इतर डॉक्टर्स, विविध विभागांतील कर्मचारी यांच्या प्रयत्नाने व नागरिकांच्या नियम पाळण्याने कुर्डुवाडी शहरातील कोरोना बाधितांची संख्या बोटावर मोजण्याइतके खूप कमी झाली होती. परंतु, दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाचे "कम बॅक' झाले की काय, असे वाटत आहे. पुन्हा कोरोना बाधितांची संख्या फार नाही पण थोडी - थोडी वाढू लागली आहे.
विविध प्रसार माध्यमांमधून कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याचे किंवा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेची माहिती सर्वांना झाली आहे. शासनाने कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी वेळोवेळी नियमावली दिली आहे. त्यामध्ये इतर स्वच्छतेच्या बाबींसह एसएमएस (सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायजेशन) याला खूप महत्त्व दिले आहे. अनेकजण मास्क वापरण्याबाबत हलगर्जीपणा करत असल्याचे दिसत आहे. मला गुदमरतेय, ऍलर्जी आहे, ठसका लागतो, कान दुखतो अशा एक ना अनेक सबबीखाली काही जण विनामास्क फिरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मास्क वापरताना दिसत आहेत. काही जणांच्या खिशात मास्क असतो. मास्क का घातला नाही, असे विचारले की खिशातून बाहेर काढतात व हा आहे की मास्क, असे म्हणून नाका - तोंडावर लपेटून घेतल्यासारखे करतात. काही जणांचे नाक व तोंड उघडे पण मास्क मात्र हनुवटीवर असतो. काही जणांचा रुमालरूपी मास्क गळ्यात असतो.
कोणीतरी दंडात्मक कारवाई करणार म्हणून मास्क न घालता स्वतःच्या, कुटुंबाच्या व समाजाच्या आरोग्यासाठी नागरिकांनी स्वतःहून योग्य पद्धतीने मास्क घातला पाहिजे, असे सूत्र नागरिकांचे म्हणणे आहे.
व्यापाऱ्यांनी ग्राहकांना मास्क असल्याशिवाय दुकानात प्रवेश देऊ नये. मास्क न वापरणाऱ्यांना गांधीगिरी करत गुलाबपुष्प दिले आहे. मास्क न वापरणारे लोक कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरू शकतात. विनामास्क असलेल्यांवर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
- तुकाराम पायगण,
स्वच्छता निरीक्षक, कुर्डुवाडी नगरपरिषद
संपादन : श्रीनिवास दुध्याल