उसाच्या सरीत पाणीच पाणी ! गाळप हंगाम लांबण्याच्या चिन्हामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची भीती 

राजाराम माने 
Tuesday, 27 October 2020

परतीच्या पावसाचा ऊस पट्ट्यात सुरू असलेला कहर व कोरोनाची भीती यामुळे यंदा साखर हंगाम लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची शेतकऱ्यांना धास्ती लागली आहे. 

केत्तूर (सोलापूर) : परतीच्या पावसाचा ऊस पट्ट्यात सुरू असलेला कहर व कोरोनाची भीती यामुळे यंदा साखर हंगाम लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची शेतकऱ्यांना धास्ती लागली आहे. 

मराठवाड्यातील ऊस तोडणी मजूर, वाहतूकदार हे करमाळा तालुक्‍याच्या ऊस पट्ट्यात येतात. मात्र यंदा प्रामुख्याने साखर पट्ट्यात अजूनही कोरोनाचा कहर असल्याने हे मजूरही धास्तावलेले आहेत तर ऊस पट्ट्यामध्ये रोज परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्याने उभ्या उसाच्या पिकाच्या सरींमध्ये पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊस तोडणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

करमाळा तालुक्‍याच्या ऊसतोड पट्ट्यात काही परिसरात ऊसतोड मजूर दाखलही झाले आहेत. परंतु उसाच्या सरीमध्ये पाणी साचल्याने ऊस तोडणे अवघड झाले आहे. त्यातच मुसळधार पावसाने रस्त्यांचीही पुरती वाट लावल्याने शेतातून ऊस बाहेर काढणे जिकिरीचे होणार आहे आणि हेही संकट आहेच. पावसाने शेतात प्रचंड दलदल निर्माण झाली आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. उजनी लाभक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन हे उसातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असते. दिवाळीपूर्वी कारखान्यांनी ऊस नेला तर पहिल्या पंधरा दिवसांच्या बिलाचा हप्ता दिवाळीपर्यंत त्यांच्या हातात येतो. परंतु यावर्षी पावसामुळे ऊस तोडणीच न झाल्याने दिवाळीपूर्वी पैसे येणार नाहीत, मग दिवाळी कशी करायची, असा प्रश्न छोट्या उत्पादकांना पडला आहे. मध्यंतरीच्या वादळी पावसाने गाळपास जाणारा ऊस भुईसपाट झाला आहे. तो ऊस असाच पाण्यात राहिल्यास कुजण्याची भीती आहे. वेळीच तोडणीयोग्य ऊस पिकाची तोडणी होणे गरजेचे आहे. नाहीतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आणखी संकट उभे राहणार आहे. 

राज्यातील ऊस गाळप हंगाम 15 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार होता; परंतु पावसामुळे तो पुढे ढकलला आहे. साखर आयुक्तांनी राज्यातील 79 कारखान्यांना ऊस गाळप परवाने दिले आहेत. करमाळा तालुक्‍यातील भैरवनाथ शुगर, कमलादेवी ऍग्रो तसेच मकाई सहकारी हे कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. तालुक्‍यातील मोठ्या प्रमाणावर ऊस घेऊन जाणाऱ्या बारामती ऍग्रो या कारखान्यानेही गाळप सुरू केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of loss to farmers due to delay in crushing season of sugar mills