ग्रामीण भागाला भीती सोलापुरातील रुग्णालयांची 

प्रमोद बोडके
Saturday, 20 June 2020

ग्रामीण भागाचा भर होम क्वारंटाइनवर 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जास्तीत जास्त संशयितांना होम क्वारंटाइन करण्यावर भर दिला जात आहे. आज आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दोन हजार 282 जण होम क्वारंटाइन आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये 684 जण आहेत. सोलापूर महापालिकेच्या वतीने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन आणि होम आयसोलेशनवर अधिक भर देण्यात येत आहे. 

सोलापूर : कोरोनाचा पहिला रुग्ण आणि पहिला बळी 12 एप्रिल रोजी सोलापुरात गेला. अवघ्या दोन ते अडीच महिन्यांत संपूर्ण सोलापूर शहर आता हाताबाहेर गेले आहे. जिल्ह्याचा ग्रामीण भाग सुरक्षित असे वाटत असतानाच आता ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उपचारासाठी सोलापुरात आल्यानंतर येथील दवाखान्यातून आपल्याला कोरोनाची लागण होईल की काय? अशीच भीती ग्रामीण भागाला लागली आहे. कोरोनापेक्षाही सोलापुरातील रुग्णालयांचीच अधिक भीती वाटू लागल्याने कोरोनाच्या लढाईत दवाखान्यांबद्दल विश्‍वास निर्माण करण्याची आवश्‍यकता झाली आहे. 

सोलापूर शहरात कोरोना आटोक्‍यात येत नसतानाच आता सोलापूर शेजारी असलेल्या तालुक्‍यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अक्कलकोट तालुक्‍यातील कोरोनाची स्थितीही सर्वांची चिंता वाढवू लागली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 11 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यापैकी चार जण हे अक्कलकोट तालुक्‍यातील आहेत. अक्कलकोट प्रमाणेच सोलापूर शेजारी असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्‍याचीही स्थिती गंभीर होऊ लागली आहे. कुंभारी आणि मुळेगाव परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट तयार झाला आहे. या तालुक्‍यातील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बार्शी, माढा, मोहोळ आणि सांगोला या तालुक्‍यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींच्या यादीत अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर हे तालुके सध्या तरी अव्वल दिसत आहेत.

सोलापूर शहरातील कोरोनाची स्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यावर प्रमुख जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्यावर आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना घेऊन सोलापूर जिल्ह्यातील कोरोना आटोक्‍यात आणण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यावर आहे. ग्रामीण भागातील कोरोना वेळीच आटोक्‍यात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्‍यक आहेत. पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी कोरोना मुक्तीसाठी केलेला पंढरपूर पॅटर्न त्या भागासाठी सध्या उपयुक्त ठरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of rural hospitals in Solapur