पुन्हा दाटले अवकाळी पावसाचे मळभ ! द्राक्ष बागायतदारांसह विविध फळे, पालेभाज्या उत्पादक चिंतेत 

grapes
grapes
Updated on

वाळूज (सोलापूर) : अवकाळी पावसाचे मळभ पुन्हा दाटले असून 6 आणि 7 तारखेला महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविल्याने वाळूज, देगाव (ता. मोहोळ) परिसरासह जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक तसेच विविध फळे व पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

मागील तीन महिन्यांपूर्वी मोहोळ तालुक्‍यासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यातून शेतकरी अजूनही सावरले नाहीत. त्या तडाख्यातून कशीबशी वाचलेली पिके आणि फळबागांवर खते, औषधांसाठी हजारो - लाखो रुपये खर्चून द्राक्ष बागांसह विविध फळबागा जगविल्या आहेत. ज्या वाचल्या त्या बागांना चांगली फळधारणा झाली आहे. वाळूज, देगाव, भैरववाडी, मनगोळी (ता. मोहोळ) परिसरात 300 ते 400 एकर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. तसेच 100 एकरापर्यंत नवीन बागांची लागवड झाली आहे. सध्या द्राक्ष घडातील मणी चांगल्या फुगल्या आहेत. घडांत साखर उतरायला सुरवात झाली आहे. त्यातच पुढील एक- दोन दिवसांत पुन्हा अवकाळी पाऊस पडला तर सगळ्या कष्टावर पाणी पडणार आहे. आता जर पाऊस पडला तर द्राक्ष घडांमध्ये उतरलेली साखर परत माघारी जाते, त्यामुळे मणी लूज पडतात. गोडी उतरत नाही त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

राज्यात कडाक्‍याची थंडी पडली असून, दिवसेंदिवस तापमानाचा पारा घसरत चालला आहे. त्यातच 6 आणि 7 जानेवारीला महाराष्ट्रात हलक्‍या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून अवकाळी पावसाचे मळभ पुन्हा दाटले आहेत. द्राक्ष बागायतदारांसह कांदा उत्पादक, विविध फळे, पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्‍याची थंडी असली तरी सध्या महाराष्ट्रात आणि सोलापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच आकाश ढगांनी झाकोळून आले होते. सकाळी हलकासा पावसाचा शिडकावाही झाला. यामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे. 

अतिवृष्टीच्या तडाख्यातून लाखो रुपये खर्चून आम्ही द्राक्षबागा जगविल्या आहेत. आता द्राक्ष घडांतील मणी चांगल्या फुगल्या आहेत. मात्र पुढील दोन - तीन दिवसांत अवकाळी पाऊस पडल्यास हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे पुन्हा हिरावला जाणार आहे. 
- सुदर्शन पाटील, 
द्राक्ष उत्पादक, वाळूज (दे), ता. मोहोळ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com