सासरच्या छळास कंटाळून शिंगोर्णी येथे विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल 

गहिनीनाथ वाघंबरे 
Thursday, 24 September 2020

शिंगोर्णी (ता. माळशिरस) येथील विवाहितेचा पैशासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली. शुभांगी पांडुरंग आटपाडकर (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, याबाबत विवाहितेची आई मंगल भारत शिंदे (वय 50) यांनी माळशिरस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

माळशिरस (सोलापूर) : शिंगोर्णी (ता. माळशिरस) येथील विवाहितेचा पैशासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली. शुभांगी पांडुरंग आटपाडकर (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, याबाबत विवाहितेची आई मंगल भारत शिंदे (वय 50) यांनी माळशिरस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पांडुरंग आटपाडकर याच्याशी शुभांगीचा विवाह सहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. शुभांगी ही पती पांडुरंग, सासू नीलाबाई यांच्यासह एकत्र कुटुंबात राहात होती. लग्न झाल्यापासून पती व सासू हे दोघे घरातील किरकोळ कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास देऊन शुभांगीचा छळ करीत होते. लग्नानंतर दोन्ही वेळेस बाळंतपणात मुली झाल्या. त्याही वेळी तिचा छळ, अपमान करून तिला त्रास दिला जात होता. तिसऱ्या वेळी मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर पती व सासूने शुभांगीस व्यवस्थित नांदवले. 

त्यानंतर पती व सासूने ट्रॅक्‍टरचे हफ्ते भरण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी शुभांगीला मारहाण करण्यास सुरवात केली. शुभांगीच्या आईने, आमच्याकडे पैसे आल्यानंतर हफ्ते भरण्यासाठी पैसे देऊ, असे जावयास सांगितले. त्यानंतर रविवारी (ता. 20) रात्री नऊ वाजता फिर्यादीच्या भावाने, शुभांगी हिने राहत्या घरी विष प्राशन केले आहे, उपचारासाठी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती फोनवरून शुभांगीच्या आईला दिली. उपचार चालू असताना शुभांगीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती पांडुरंग व सासू नीलाबाई आटपाडकर (रा. शिंगोर्णी, ता. माळशिरस) यांच्या विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद आईने माळशिरस पोलिस ठाण्यात दिली आहे. याचा पुढील तपास पिलीव औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fed up with the persecution the married woman committed suicide at Shingorni