सोलापूरला बाप नसल्याची भावना अधोरेखीतच !  महापालिका आयुक्त बदलले; जिल्हाधिकारी सुटले? 

अभय दिवाणजी 
शनिवार, 30 मे 2020

जनजीवन सुरळीत करण्याची मागणी 
कोरोनाला रोखण्याच्या कामाला तर प्रथम प्राधान्य तर द्यावेच. त्याचबरोबर जनजीवनही सुरळीत होण्याची आवश्‍यकता आहे. गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून नागरिक घरी बसून आहेत. हातावरचे पोट असलेले उपाशीपोटी आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. सर्व नियम पाळून जनजीवन सुरळीत करण्याचे मोठे आव्हान आहे, ते पेलावे लागणारच आहे. कोरोनाबरोबरच उपाशी मरणाऱ्यांची संख्या वाढेल. आमच्या प्रस्तावांना टोलवाटोलवी केली जाते. आम्ही प्रशासनास जाब विचारु शकत नाही. उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची आता गरज आहे, असा सूर एका "बड्या' उद्योजकाने काढला. तुम्हीच काहीतरी करा असे सांगून त्यांनी हतबलता व्यक्त केली. 

 

सोलापूर : सोलापुरातील कोरोनाच्या अपयशाला जबाबदार धरुन राज्य सरकारने महापालिका आयुक्‍त दीपक तावरे यांची बदली केली. सोलापुरातील कोरोना रोखण्यात जेवढी जबाबदारी महापालिका आयुक्तांची होती तेवढीच जबाबदारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचीही आहे. आयुक्तांचे वरिष्ठ म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाहिल जाते. आयुक्तांनी काम केले नाही म्हणून त्यांची बदली केली. पण जिल्ह्याचे समन्वयक म्हणून जबाबदारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे काय ? सोलापुरात कोरोनाचा कहर वाढतच आहे. सोलापुरातील कोरोनाचा मृत्यूदर येत्या काळात अमेरिका आणि चीनलाही मागे टाकेल की काय ? अशीच भिती निर्माण होत आहे. सोलापूरचे पालकमंत्री बाहेरचे, प्रशासनात गोंधळ अशा विचित्र स्थितीत सोलापूरला बाप नसल्याची भावना रुजू लागली आहे. इतके सारे असले तरी पुण्याच्या धर्तीवर जनजीवन सुरळीत करावे लागणार आहेच. 

शासनाने श्री. तावरे यांची तडकाफडकी बदली करून राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पी. शिवशंकर यांची नियुक्तीही केली. आयक्त बदलले, कोरोनाची स्थिती बदलेल का ? कोरोना आज संपेल, उद्या संपेल याची वाट पाहण्यातच अनेकांचे व्यवसाय, उद्योग, रोजगार संपण्याच्या मार्गावर आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाय योजना करून कोरोनासोबत जगण्याची शैलीच आता आवश्‍यक आहे. आगामी काळात हीच कसेटी प्रशासनासमोर राहील. 

12 एप्रिलपर्यंत कोरोनापासून कोसो दूर असलेल्या सोलापुरात किराणा दुकानदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कोरोनाची चाचणी पॉझीटीव्ह आली. त्यानंतर गेल्या केवळ 48 दिवसात कोरोनाने सोलापुरात अक्षरशः थैमान घातले. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात रुग्ण संख्येने शतकपार केल्यानंतर सर्वांचेच डोळे विस्फारले. तुरुंगातील कैदी अन्‌ कर्मचाऱ्यांपर्यंत कोरोनाने धडक मारल्याची जबाबदारी नेमकी कोणाची ? या कालावधीत एकूण 78 मृत्यू व 860 बाधीत झाले. दरम्यान, 351 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविल्याचा सुखद धक्का आहे. 

संपूर्ण राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबादबरोबर सोलापूरचीही आकडेवारी दिवसागणीक वाढतच चालली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहारांची लोकसंख्या व कोरोनाचा बाधित व मृत्यूदर आणि सोलापूरची लोकसंख्या व कोरोनाचा बाधित व मृत्यूदर निश्‍चितच सोलापूरच्या प्रशासनाचे अपयश सांगण्यास पुरेसा आहे. सोलापूरचा मृत्यूदर जवळपास नऊ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. कोरोनाची आकडेमोड करण्यातच सोलापूरकरांचा दिवस जावू लागला आहे. दररोजच सकाळी-संध्याकाळी येणाऱ्या कोरोनाच्या अपडेटस्‌मुळे सोलापूरकरांची झोप अक्षरशः उडाली आहे. सोलापूरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण मिळण्यापूर्वी संपूर्ण शहराचे "स्कॅनिंग' करणे गरजेचे होते. त्या काळात आपल्याकडे कोरोना नसल्याचे छाती फुगवून सांगत प्रशासन हातावर हात ठेवून बसले. रुग्ण वाढण्यास सुरवात झाल्यानंतर सर्व यंत्रणा नुसतीच जागी झाली. केले काहीच नाही. प्रत्येकवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यातील समन्वयाच्या अभावावर चर्चाच होत राहिली. या पार्श्‍वभूमीवर दोन अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. परंतु त्यांचाही काही उपयोग झाला नाही. आयुक्तांच्या बदलीमागे राजकारण असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. यात काही प्रमाणात तथ्यही असेल. कारण जिल्हा प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना मात्र शासनाने काहीच केले नाही. 

रुग्णांचे स्वॅब घेण्यात होणारी दिरंगाई, कोरोना व नॉन कोरोना व्यक्तींना एकत्रच ठेवणे, क्वॉरंटाईन केंद्रातील दूरवस्था, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, प्रशासनाची अनास्था, सर्वसामान्यांचे जाणारे बळी पाहता सोलापूरला दिशा देणारा, नियंत्रण ठेवणारा बाप माणूसच नाही. पालकमंत्री कधीतरी पर्यटनाला येतात, ते आढावा बैठका घेऊन निघून जातात. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा दबाव तर काहीच राहिला नाही. खासगी दवाखाने रुग्णांना दाखल करुन घेत नाहीत. या साऱ्या प्रक्रियेत सर्वसामान्यांची हेळसांड मात्र होऊ लागली आहे. केवळ उपचाराअभावी एकतर घरात नाहीतर दवाखान्याच्या दारात रुग्ण मरण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले आहे. विजापूर नाक्‍यावरील एका तरुणाचा उपचारातील दिरंगाईमुळे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या भावाने "व्हायरल' केलेल्या व्हीडीओने सोलापुरातील आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढणारे वास्तव दिसले. परंतु अजूनही यंत्रणा ढिम्मच आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The feeling that Solapur has no father is underlined! Municipal Commissioner changed; Collector released?